Pune Graduate Constituency Election Pudhari
पुणे

Smita Jadhav: पदवीधर निवडणुकीसाठी डॉ. स्मिताताई जाधव यांचा ग्रामीण भागात प्रचाराचा जोर वाढला

पाटीलबुवा गवारी यांच्याकडून खेड तालुक्यात घरोघरी संपर्क; शिक्षक, बेरोजगार पदवीधरांच्या प्रश्नांवर भर, शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिताताई जाधव यांच्या प्रचाराचा वेग आता ग्रामीण भागातही वाढला आहे. खेड तालुक्यातील आळंदी ग्रामीण मंडळ अध्यक्ष आणि खेड पंचायत समितीचे माजी सभापती पाटीलबुवा गवारी आणि सहकाऱ्यांनी घरोघरी भेट देऊन तसेच शाळा आणि महाविद्यालयांत जाऊन प्रचार सुरू केला आहे.

पाटीलबुवा गवारी यांनी आळंदी आणि खेड परिसरातील गावांमध्ये दैनंदिन दौरे सुरू ठेवले आहेत. ते मतदारांना थेट भेटून डॉ. स्मिताताई जाधव यांचा शैक्षणिक अनुभव आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती देत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांत तरुण पदवीधर आणि शिक्षकांशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन ते देत आहेत.

डॉ. स्मिताताई जाधव यांनी गेल्या दोन दशकांत शिक्षण क्षेत्रात काम केले आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू म्हणून त्यांचा अनुभव लक्षात घेता, पदवीधर मतदारांच्या शैक्षणिक अडचणी, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे प्रश्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले जात आहे. बेरोजगार पदवीधर, कौशल्य विकासाच्या संधी, उद्योग- शिक्षण समन्वय आणि ‘विकसित भारत’ ध्येयानुसार ज्ञानाधारित विकास, यावर भर देण्यात येत आहे. जुन्या पेन्शन, टीईटी, अशैक्षणिक कामांचा बोजा आणि शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी विधानपरिषदेत आवाज उठविण्याचे आश्वासन डॉ. स्मिताताई जाधव यांच्या वतीने कार्यकर्ते देत आहेत.

पाटीलबुवा गवारी यांनी सांगितले की, डॉ. स्मिताताई जाधव यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि अनुभव हा पदवीधर मतदारसंघासाठी उपयुक्त आहे. आम्ही प्रत्येक गावात, प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहोत. त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन विधान परिषदेत मजबूत प्रतिनिधित्व मिळेल, यासाठी प्रयत्नशील आहोत.

या वेळच्या शिक्षक मतदारसंघातील उमेदवार एक सुशिक्षित आणि शिक्षकांचे प्रश्न माहीत असलेल्या आहेत, त्यांचे शिक्षण क्षेत्रातील काम खूप प्रशंसनीय आहे. माझ्या संस्थेमध्ये अनेक शिक्षक काम करीत आहेत. त्या सर्वांचे मतदान डॉ. स्मिता जाधव यांनाच होईल, तसेच माझ्या संपर्कात अनेक शिक्षक संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यांच्याकडूनही मतदान करून घेईन. मला खात्री आहे डॉ. स्मिता जाधव निवडून येतील आणि शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अग्रेसर राहतील.
शिवाजीराव आढळराव पाटील, अध्यक्ष, म्हाडा पुणे, माजी खासदार, शिरूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT