पुणे

खंडणीसाठी अपहरण करणार्‍या सहा जणांना बेड्या; पोलिसाचाही समावेश

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा
व्याजाने घेतलेल्या पैशासाठी एकाचे अपहरण करून त्याला शिरूरहून पुण्यात आणून डांबून ठेवत 50 लाखांची खंडणी किंवा 5 एकर जमीन कागदोपत्री नावावर करून मागणार्‍या सहा जणांना खंडणीविरोधी पथक 1 ने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुणे शहर पोलिस दलातील एकाचा समावेश आहे.

अनिल लक्ष्मण हगवणे (वय 33), किरण सोपान भिलारे (वय 35, रा. भिलारेवाडी, कात्रज), विशाल अनिल जगताप (वय 22, भिलारेवाडी, कात्रज), संदीप चंद्रकांत पोखरकर (वय 24, धनकवडी), अभिजित दत्तात्रय देशमुख (वय 29, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि पोलिस शिपाई मनोज ज्ञानेश्वर भरगुडे (वय 32, रा. ज्ञानेश्वरी अपार्टमेंट, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत टाकळी हाजी येथील एका तरुणाने खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिल्यानंतर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हगवणे याच्याकडून फिर्यादी यांनी मार्च 2018 मध्ये व्यवसायासाठी 10 टक्के व्याजाने 15 लाख रुपये, किरण भिलारेकडून 10 टक्के व्याजाने 9 लाख रुपये घेतले होते. त्यातील साडेअकरा लाख परत केले असताना संशयित आरोपींनी मुद्दलाची रक्कम व व्याज असे मिळून 50 लाख रुपये द्यावेत किंवा 5 एकर जमीन लिहून द्यावी, अशी मागणी केली. तसे न दिल्यास पत्नी व मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. 17 डिसेंबरला चार वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींनी त्यांच्या कारमधून फिर्यादीचे अपहरण केले.

ते फिर्यादीला बालाजीनगर येथील सद्गुरू शंकरमहाराज मठ परिसरात घेऊन आले. तेथे त्यांना मनोज भरगुडे याने मारहाण करून 'हगवणे यांच्या पैशाचा विषय मिटवून टाक,' अशी दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला मठाच्या पाठीमागील शेडमध्ये डांबून ठेवले. नंतर अभिजित देशमुख व रंजित पायगुडे यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीला 18 डिसेंबरला पहाटे चार वाजता भिलारेवाडी येथील किरण भिलारे याच्या कार्यालयात डांबून ठेवण्यात आले.

कुटुंबीयांना फोन करून खंडणीची मागणी

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या बहिणीला व चुलतभावाला फोन करून किरण भिलारे यांचे नावे पाच एकर जमीन लिहून द्या, नाहीतर फिर्यादीला मारून टाकू व त्याच्या घरातल्या लोकांनाही सोडणार नाही, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, खंडणी विरोधी पथक 1 चे अमंलदार रमेश चौधर, अमर पवार यांना संशयित आरोपींबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप बुवा, पोलिस उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार यशवंत ओंबासे, रवींद्र फुलपगारे, रमेश चौधर, नितीन कांबळे, गजानन सोनवलकर, अमर पवार यांनी सहा जणांना अटक करून शिरूर पोलिसांच्या हवाली केले.

शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एच. एस. पडळकर यांनी संशयितांना न्यायालयात हजर केले. संशयित आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विजय ठोंबरे आणि अ‍ॅड. हितेश सोनार यांनी पोलिस कोठडी ठेवण्याला विरोध केला. मात्र त्यांना 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

पोलिस शिपायाला म्हणून झाली अटक

पोलिस शिपाई मनोज भरगुडे हा शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत आहे. तो संशयित आरोपींचा मित्र असून त्याच्या सांगण्यावरून भरगुडे याने फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे प्रकार घडल्याने त्याला याप्रकरणी आरोपी करून अटक करण्यात आली आहे.

पोलिस कोठडीचा आदेश

हगवणे आणि भिलारे यांनी फिर्यादीला व्याजाने दिलेल्या 24 लाख रुपयांच्या बदल्यात फिर्यादीकडून वेळोवेळी व्याजापोटी पैसे घेतले आहेत. त्याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करायची आहे. अटक करण्यात आलेले संशयित आरोपी हे व्याजाने पैसे देणारे सावकार असून त्यांनी आणखी कोणाला पैसे दिले, याचा तपास करायचा असल्याने त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली.

SCROLL FOR NEXT