मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क
कमकुवत जागतिक संकेत आणि ओमायक्रॉन धास्तीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) सोमवारी (दि.२०) सकाळच्या सत्रात सुरुवातीलाच तब्बल १०४० अंकांनी कोसळला. निफ्टी देखील ३०० हून अधिक अंकांनी खाली आला. त्यानंतर सेन्सेक्सची ही घसरण सुरुच राहिली. बाजार बंद होताना सेन्सेक्सची ११८९.७३ अंकांनी घसरण होऊन तो ५५,८२२ अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला होता. सकाळच्या सत्रातील घसरण ही १.८८ टक्के एवढी होती. सेन्सेक्सच्या ३० पैकी २९ शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
पाश्चिमात्य देशांत कोरोनाच्या ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या आणि जागतिक बाजारपेठेतील कमजोरीचे सोमवारी भारतीय शेअर बाजारात पडसाद उमटले. बाजारातील घसरणीमुळे सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांना १५ मिनिटांत तब्बल ५.१९ लाख कोटी रुपयांचा फटका बसला. त्यानंतर घसरण कायम राहिल्याने गुंतवणूकदारांना एकूण ९ लाख कोटींहून अधिक आर्थिक फटका बसला.
जागतिक स्तरावरील कमजोरीमुळे परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शेअर्स विक्रीचा सपाटा लावला आहे. काही नकारात्मक घटकांमुळे बाजारात घसरणीची चिंता निर्माण झाली आहे. तसेच वाढती महागाई, ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या, विकसित अर्थव्यवस्थांमधील वाढीचा वेग मंदावणे आदी कारणांमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा :