पुणे

पिंपरी चोरीच्या सहा घटना

backup backup

13 लाख 40 हजारांचा ऐवज लंपास

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मंगळवारी (दि. 1) शहरात सहा ठिकाणी चोरीच्या घटना सामोर आल्या आहेत.

यामध्ये एकूण 13 लाख 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पिंपरी चोरीच्या सहा घटना

पहिल्या घटनेत आकुर्डी येथील आयटीआय शिक्षण संस्थेत अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. याप्रकरणी अशोक शरणाप्पा मोरे (55, रा. पिंपळे गुरव) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चोरटयांनी टेरेसवरील खिडकीचे लोखंडी गज कापून आयटीआयच्या वर्कशॉपमध्ये प्रवेश केला. तेथील गरम, गार पाण्याचे गिझर, नळ बंद करण्याचे स्टॉपर, नळ, वॉश बेसिन, तांब्याची वेल्डिंग केबल, तांब्याचे पाईप, गॅस वेल्डिंग मशीन असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तपास निगडी पोलिस करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत अभिषेक हेमंत लेंडघर (20, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांचा 12 लाख रुपये किमतीचा मिनीटिपर दावडमळा फाटा, चाकण येथून चोरून नेला.

तिसर्‍या घटनेत गुलाब अब्दुल करीम शेख (42, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजारांची दुचाकी वाकड येथील ए.वन. विस्टा सोसायटीच्या पार्किंग चोरट्यांनी चोरून नेली.

चौथ्या घटनेत अविनाश विलास देशमुख (28, रा. एनडीए रोड, शिवणे) यांची 30 हजारांची दुचाकी थेरगाव येथील पंडित पेट्रोल पंपाजवळून चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत देशमुख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलिस करीत आहेत.

पाचव्या घटनेत राजेश रामकवल यादव (39, रा. जाधववाडी, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नीलम रवी देशमुख (22, रा. रुपीनगर, निगडी) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महिलेने चिंचवड एमआयडीसी येथून बलवंत इंडस्ट्रीज या कंपनीतून 29 हजार 400 रुपये किमतीचे तांब्याचे साहित्य चोरून नेले आहे. तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

सहाव्या घटनेत चोरटयांनी नदीच्या बंधार्‍याजवळ ठेवलेले 35 हजारांचे गंजलेले व खराब झालेले लोखंडी ढापे चोरून नेले आहेत. हा प्रकार 31 जानेवारी रोजी शेलपिंपळगाव येथील भीमा नदीजवळ उघडकीस आला. याप्रकरणी रवींद्र सांडभोर (53, रा. गवार वस्ती, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

SCROLL FOR NEXT