नाशिक : शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पतीकडूनच खून, जळीतकांडाची उकल | पुढारी

नाशिक : शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पतीकडूनच खून, जळीतकांडाची उकल

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून त्यांचे पती संदीप वाजे यांनी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. कौटुंबिक वादातून पतीने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात संदीप वाजेसह इतर संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप वाजे यास अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाडिवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत जळालेल्या कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याचा अंदाज वर्तवला गेला. मात्र मृतदेहाची ओळख पटवणे शक्य नसल्याने पोलिसांनी डीएनए चाचणी केली. दरम्यान, पोलिसांनी समांतर तपास सुरु केला होता. त्यात डॉ. वाजे यांच्या पतीसह इतर नातलगांकडे चौकशी केली. तर प्रादेशिक परिवहन विभागाने जळालेल्या कारची माहिती व कारला कशामुळे आग लागली असेल याचा अहवाल सादर केला.

डीएनए चाचणीत आढळलेला मृतदेह डॉ. वाजे यांचाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संशयावरून संदीप वाजे यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप वाजे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांचे व सुवर्णा वाजे यांचे कौटुंबिक कलह होते. सात ते आठ वर्षापासून त्यांच्यात वाद असल्याने दोनदा फारकतीपर्यंत प्रकरण गेले होते. मात्र त्यानंतर संदीप वाजे याने पुर्वनियोजीत कट रचून डॉ. वाजे यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या खुनप्रकरणात इतर तीन ते चार संशयित आरोपींचा सहभाग आढळून आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. संदीप वाजे याने पत्नीचा खून कसा व कोठे केला, त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कारला आग कोणत्या रसायनाने लावली याचा तपास पोलिस करीत आहेत.

हे ही वाचलं का ?

Back to top button