नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनीची एक लाख रुपयांत गुजरातमध्ये विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरच्या एमआयडीसी भागात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुजरातच्या दोन युवकांसह तिघांना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
विशाखा प्रदीप बिस्वास (वय ३५, रा. एमआयडीसी), निखिल गिरीशभाई पटेल (वय ३५, रा. मोठी चिचोली, अरवली गुजरात) व प्रकाश मेघाभाई वनकर (वय ३० रा. मेघरज, जि. अरवली), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पीडित १६ वर्षीय मुलगी शिक्षण घेत होती. तर तिचे आई- वडील एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. आरोपी विशाखा प्रदीप बिस्वास ही महिला पीडित मुलीसह तिच्या कुटुबीयांना ओळखत होती. डिसेंबर महिन्यात विशाखाला अल्पवयीन मुलीस भेटली. यानंतर विशाखाने तिला गुजरातमध्ये कापडाच्या दुकानात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यानंतर विशाखा अल्पवयीन मुलीस घेवून गुजरातला गेली. तेथे निखिलच्या माध्यमातून विशाखाने एक लाख रुपयांमध्ये प्रकाशला तिची विक्री केली. प्रकाशने मुलीशी लग्न केले.
याच दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर, महिला साहाय्यक पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे, हेड कॉन्स्टेबल ओमप्रकाश, राजेश, विजय, रवींद्र जाधव व सचिन यांनी मुलीचा शोध सुरू केला. तपासा दरम्यान मुलगी विशाखाला भेटल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी विशाखाला अटक केली. त्यानंतर तिला घेऊन पोलिस गुजरातला पोहोचले असून अल्पवयीन मुलीची सुटका करून अन्य दोघांनाही अटक केली.
विशाखा या टोळीची सूत्रधार आहे. तिने अल्पवयीन मुलीचे बनावट दस्तऐवज तयार केल्याची शक्यता आहे. त्या आधारेच तिचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याचे तिने प्रकाशला सांगितले होते. विशाखाने आणखी कोणाची विक्री केली आहे का? याचा तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.
हेही वाचलंत का?