Regional Office Controversy Pudhari
पुणे

Regional Office Controversy: सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी गायब; आम आदमी पक्षाचा जनआक्रोश आंदोलनाचा इशारा

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नागरिक त्रस्त; सहाय्यक आयुक्तांचा दावा — आरोप चुकीचे, कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी-कर्मचारी गायब होत असल्याने समस्यांच्या तक्रारींना दाद मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्ष व संतप्त नागरिकांनी जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार यांनी मात्र हा आरोप चुकीचा असल्याचा दावा केला आहे. सध्या निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व इतर कामांसाठी जावे लागत आहे. तसेच, वेळेवर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अनेकदा सकाळी ११ वाजता क्षेत्रीय कार्यालयात गेलो तरी अजून मॅडम आल्या नाहीत. साहेब आले नाहीत, अशी उत्तरे मिळतात. दुपारी अडीच-तीन वाजताही अशीच उत्तरे मिळतात. तरी आत्ताच गेले. सध्या निवडणुकीच्या कामामुळे अधिकारी फोन घेत नाहीत. गेल्या एक वर्षापासून सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात गंभीर प्रकार सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोणी वाली नाही, अशा तक्रारी संतप्त नागरिकांनी केल्या आहेत.

क्षेत्रीय कार्यालयाच्या विविध विभागांचे शंभरांहून अधिक अधिकारी, कर्मचारी आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी आरोग्य कोठीत असतात. त्यामुळे सर्व विभागांवर देखरेख ठेऊन कामकाजाची नियमितपणे माहिती घेतली जाते. नागरिकांच्या समस्या तातडीने दूर व्हाव्यात, यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालून पथदिवे, ड्रेनेज लाइन, जलवाहिन्या आदींच्या समस्या दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येत आहेत. नागरिकांच्या गैरसोयी दूर व्हाव्यात, यासाठी सुट्टीच्या दिवशीही शनिवार, रविवारी मी कार्यालयात येत आहे.
प्रज्ञा पोतदार-पवार, सहाय्यक आयुक्‍त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय
शासकीय वेळेत अधिकारी-कर्मचारी गैरहजर असतात. सकाळी ११ वाजता गेल्यावर अधिकारी फिरतीवर गेल्याचे सांगितले जाते, असेच उत्तर पुन्हा दुपारीही दिले जाते. सहाय्यक आयुक्तही अनेकदा सकाळी नसतात, दुपारी येऊन निघून जातात.
धनंजय बेनकर, शहराध्यक्ष, आम आदमी पक्ष, पुणे शहर
खडकवासला, धायरी, दळवीवाडी, नांदोशीपासून पर्वती, जनता वसाहत, दांडेकर पुलापर्यंतचा वीस लाख लोकसंख्येचा परिसर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. पालिकेच्या विविध विभागांचे प्रमुखांसह अधिकारी-कर्मचारी क्षेत्रीय कार्यालयात नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी-कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. ‌त्यामुळे पथदिवे, पाणी पुरवठा, रस्ते, कचरा आदी समस्या दूर करण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. कार्यालयात जाऊन समक्ष भेटून तक्रार दाखल करता येत नाही. विचारणा केली असता अधिकारी फिरतीवर गेले आहेत, अशी उत्तरे देऊन नागरिकांना माघारी पाठवत आहेत.
इंद्रजित दळवी, कार्याध्यक्ष, सिंहगड रोड परिसर विकास समिती

अधिकारी दाखवा, बक्षीस मिळवाचे फलक लावणार

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी पूर्ण वेळ कार्यालयात थांबत नाहीत. स्वतः सहायक आयुक्त या कधीतरी येऊन निघून जातात. त्यामुळे इतर अधिकारी-कर्मचारी कार्यालयात फिरकतही नाहीत. अनेकजण आपल्या अलिशान बंगल्यात बसून मौजमजा करतात. वातानुकूलित महागड्या कारमधून पर्यटन करतात, अशी तक्रार आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे. ते म्हणाले, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी दाखवा आणि एक हजार रुपयांचे बक्षीस मिळवा, असे फलक लावण्यात येणार आहेत. कार्यालयाच्या इमारतीखाली असलेले सुरक्षारक्षक चौकशी करण्यासाठी गेल्यावर नागरिकांच्या अंगावर गुरगुरत धावून जातात. त्यामुळे महिला, ज्‍येष्ठ नागरिक तक्रार न करताच निघून जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT