Sinhagad Institutes Pudhari
पुणे

Sinhgad Educational Institutions: सिंहगडच्या २५ शैक्षणिक संस्थांवर सरकारची कारवाई; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई

संस्थांचा ताबा तंत्रशिक्षण विभागाच्या प्रशासकांकडे; बँक खाती आणि गुंतवणुका गोठवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सिंहगड संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त मारुती नवले यांच्यासह सर्व विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, दर शुक्रवारी डेक्कन पोलिस ठाण्यात हजेरी लावणेही बंधनकारक केले आहे. सिंहगडच्या तांत्रिक संस्थांचा ताबा आता तंत्रशिक्षण पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. सुरेश पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. संस्थेची बँक खाती आणि गुंतवणुका गोठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आता येत्या १९ नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी पार पडणार आहे.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अखत्यारीतील २५ शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनावर राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अनेक महिन्यांपासून नियमितपणे अदा न करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणे, संस्थांचे शैक्षणिक कामकाज व्यवस्थित सुरू नसणे आणि न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी न करणे, या गंभीर बाबींची दखल घेत तंत्र शिक्षण विभागाने डॉ. पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून, तब्बल २५ संस्थांचा कारभार त्यांच्या हाती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणात केवळ कर्मचाऱ्यांचे वेतन हाच मुद्दा नसून, संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित संस्थांमध्ये शैक्षणिक कामकाज व्यवस्थित पार पाडले जात नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

तसेच, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आणि तिच्या अखत्यारीतील संस्थांमधील वाद, निदर्शने आणि इतर घडामोडींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही शैक्षणिक नुकसान होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या संस्थांमधील शैक्षणिक वातावरण आणि कामकाजाच्या पद्धतीबाबत शासनाने गंभीर भूमिका घेतली आहे.

संस्थेचा कारभार सुरळीत करण्याचे प्रमुख आव्हान

या निर्णयामुळे संबंधित २५ संस्थांच्या व्यवस्थापनाची सूत्रे प्रशासकांकडे जाणार असून, संस्थांमधील शैक्षणिक कामकाज सुरळीत करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावणे, ही प्रशासकीय यंत्रणेसमोरील प्रमुख आव्हाने असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT