वेल्हे: सिंहगड परिसरासह पश्चिम हवेली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या खरीप पीक नुकसानीचे पंचनामे शासनाकडे सादर न करता गावोगावच्या ग्रामपंचायत कार्यालयांत धूळ खात पडून असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले आहेत. यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दुष्काळ अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही शासनाच्या विशिष्ट निकषांमुळे हवेलीचा दुष्काळी तालुक्यांत समावेश झाला नाही. त्यामुळे सिंहगड आणि पश्चिम हवेली भागातील शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत मिळाली नाही. तसेच दुष्काळी तालुक्यांना मिळणाऱ्या सवलतींपासूनही त्यांना वंचित राहावे लागले. त्यामुळे खरीप पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून मदत मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत.
पंचनाम्यांसाठी नियुक्त केलेले अधिकारी शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देत होते. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतरही अधिकारी, कर्मचारी गावांमध्ये फिरकले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मंगळवारी (दि. १७) सकाळी साडेदहा वाजता दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने मणेरवाडी (ता. हवेली) येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली असता हे वास्तव समोर आले.
मणेरवाडी येथील ११६ शेतकऱ्यांच्या खरीप पीक नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मात्र, हे पंचनामे अद्याप हवेली तहसील कार्यालयात सादर केलेले नाहीत. २ हजारांहून अधिक खातेदार शेतकरी असलेल्या खानापूर (ता. हवेली) येथील केवळ २४ शेतकऱ्यांची कागदपत्रे सादर केली असून, त्यांचेच नुकसानभरपाईचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयात पाठविले आहेत. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणीही वाली नसल्याचे चित्र आहे.
खानापूरचे माजी सरपंच मुरलीधर जावळकर म्हणाले, ऑनलाइन पीक पाहणी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अशिक्षित शेतकऱ्यांना वेठीस धरले गेले. दुपारी १२ वाजता येऊन अवघ्या ३ तासांत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश अधिकारी देत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे देता आली नाहीत.
मणेरवाडी येथील शेतकरी तानाजी जाधव म्हणाले, सिंहगड परिसरात सर्वप्रथम मणेरवाडी येथील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, हे पंचनामे अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात पडून आहेत.
महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या संयुक्त पथकाने खरीप पीक नुकसानीचे पंचनामे केले असून, ते शासनाकडे सादर केले आहेत. ज्या गावांमधील नुकसानीचे पंचनामे प्राप्त झाले नाहीत, त्याबाबत चौकशी केली जात आहे.अर्चना निकम, तहसीलदार, हवेली तालुका
सिंहगड-पश्चिम हवेलीतील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे शासनाकडे गेलेच नाहीत. या गंभीर प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.भीमराव तापकीर, आमदार