

पुणे: शहरात विविध विकासकामे सुरू असून, मेट्रोच्या डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी केबल पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे भिडे पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) रात्री ११ वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत भिडे पुलावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
... असा आहे वाहतूक बदल
भिडे पूलमार्गे डेक्कनकडे जाणारी वाहतूक : टिळक चौक-खंडोजीबाबा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. नदीपात्र-जयंतराव टिळक पूल : गंधर्व हॉटेल चौकमार्गे डेक्कनकडे जाता येईल. तसेच केळकर रस्ता-ओंकारेश्वर पूल-झाशी राणी चौक मार्गाचाही वापर करता येईल.
भिडे पूलमार्गे नदीपात्र रस्त्याने मेहेंदळे गॅरेज चौकमार्गे डी. पी.रोड, कर्वे रोड, कोथरूडकडे जाणारी वाहतूक : टिळक चौक-खंडोजीबाबा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच, टिळक चौक-शास्त्री रोड-गांजवे चौक-एस. एम. जोशी पूल या मार्गाचा वापर करता येईल. पुणे हॉस्पिटल येथील झेड ब्रिज (दुचाकी) पुलावरून केवळ दुचाकी वाहनांनी जावे.
डेक्कन पीएमटी बसस्टॉपमार्गे केळकर रोड, नारायण पेठेकडे जाणारी वाहतूक : टिळक चौक-खंडोजीबाबा चौकमार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच,वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक कर्मचारी व मदतनीस यांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.