वेल्हे : शिरूर, जुन्नरसारखा सपाट सखल प्रदेश राजगड, सिंहगडमध्ये नाही. सिंहगडपासून सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगा थेट रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पसरल्या आहेत.
जवळपास आठ ते दहा हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्र या भागात आहे. शिकारीसाठी बिबट्यांना दुर्गम डोंगरी प्रदेशातील घनदाट जंगलात दूर अंतरापर्यंत धाव घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्यात अधिक आक्रमकपणा आहे.
याबबत वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे म्हणाले, राजगड तालुका अति दुर्गम असल्याने या भागातील बिबटे इतर प्रदेशातील बिबट्यापेक्षा अधिक धष्टपुष्ट आणि चपळ आहेत. येथील बिबट्याची लांबी साधारण चार ते पाच फूट, तर उंची अडीच फूट आहे. एक मादी तीन ते चार बछड्यांना जन्म देते. आक्रमक पवित्रा आणि दूर अंतराची शिकार करून मादी बछड्यांचे पोषण करते. येथे बछड्यांचे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे.प्राथमिक निरिक्षणात राजगड तालुक्यात 50 हून अधिक बिबटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजगड, सिंहगडच्या जंगलात रानडुक्कर, हरिण, चितळ सांबर अशा वन्यजीवांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बिबट्यांना जंगलात शिकार मिळत आहे. अलीकडच्या काळात जंगलापर्यंत फार्म हाऊस, हॉटेलसह प्लॉटिंग, रस्ते झाले आहेत. त्यातून बिबटे कुत्री, वासरे, शेळ्या-मेंढ्या अशा लहान जनावरांची शिकार करताना दिसत आहेत. त्यामुळे गुराख्यांसह शेतकऱ्यांत दहशतीचे वातावरण आहे. फार्म हाऊस, कंपन्या नागरी वस्त्यांमध्ये शिरणाऱ्या बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे पुरेसे पिंजरे, यंत्रसामग्री , मनुष्यबळ उपलब्ध नाही.
राजगडप्रमाणे सिंहगड किल्ल्याच्या चोहोबाजूला असलेल्या जंगलात बिबट्यांची संख्या वाढली आहे. सिंहगड वन विभागाच्या पाहणीत या परिसरात दहाहून अधिक बिबटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. वन्यप्राण्यांची गणना लवकरच होणार आहे. त्यातून सिंहगड, राजगडच्या जंगलात बिबटे व इतर वन्यप्राण्यांची नेमकी माहिती मिळणार आहे.
रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पसरलेल्या घनदाट जंगलात बिबट्यांना वन्यप्राण्यांची शिकार मिळत आहे. त्यामुळे शिरूर, जुन्नर तसेच राज्यातील इतर भागाप्रमाणे सिंहगड, राजगडमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी होत नाही. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचे मृत्यूचे प्रमाणही तुलनेत कमी आहे.वैशाली हाडवळे, वन परिमंडळ अधिकारी, पानशेत वन विभाग