Dispute Pudhari
पुणे

Sinhagad Fort: सिंहगड घाटात मद्यपी पर्यटक आणि स्थानिकांमध्ये तुंबळ हाणामारी; दोघांना मारहाण, मोबाईल गायब

कोंढणपूर नाक्यावरील घटनेनंतरही तक्रार दाखल नाही; दिवाळी सुटीच्या अखेरच्या दिवशी राजगड, सिंहगड, तोरण्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील कोंढणपूर नाक्यावर मद्यपी पर्यटक आणि स्थानिक युवकांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शनिवारी (दि. १४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

या मारहाणीत दोन मद्यपी युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. दरम्यान, यातील एका युवकाचा मोबाईल गायब झाला. या घटनेबाबत वन विभाग किंवा हवेली पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

वडगाव बुद्रुक येथील दोन युवक मद्यपान करून कारमधून आले होते. या कारने काही वाहनांना धडक दिल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी कारचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्राला जाब विचारला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे तुंबळ हाणामारीत झाले. स्थानिक युवक आणि त्याच्या वडिलांनी दोन्ही मद्यपी युवकांना बेदम मारहाण केली.

या गोंधळात एकाचा मोबाईल गायब झाला. या घटनेची अधिकृत तक्रार अद्याप पोलिसांकडे किंवा वन विभागाकडे करण्यात आलेली नाही.दरम्यान, दिवाळी सुटीच्या अखेरच्या दिवशी रविवारी (दि. १५) राजगड, सिंहगड आणि तोरणागडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

राजगडावर दिवसभरात ८ ते १० हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. पाल खुर्द तसेच गुंजवणी पायी मार्गावरही पर्यटकांची मोठी वर्दळ होती. गडावरील दुर्गम बालेकिल्ल्यावर चढाई करण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT