Thapaling Yatra Khandoba Pudhari
पुणे

Thapaling Yatra Khandoba: श्री थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ; पहिल्याच दिवशी एक लाख भाविकांनी घेतले खंडोबा देवाचे दर्शन

पौष पौर्णिमेनिमित्त थापलिंग गडावर ‘सदानंदाचा येळकोट’चा गजर; नवसाचे 200 बैलगाडे धावले

पुढारी वृत्तसेवा

पारगाव : नागापूर (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध श्री थापलिंग यात्रेला शनिवारी (दि. 3) भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले. ‌’सदानंदाचा येळकोट‌’ असा जयघोष करून पारंपरिक तळीभंडार केला.

पौष पौर्णिमेला थापलिंग गडावर दोन दिवस मोठी यात्रा भरते. यंदा यात्रा शनिवारी रविवारी सुट्‌‍ट्यांच्या दिवशी आल्याने पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळपासूनच गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातील ग््राामस्थ मोठ्या संख्येने यात्रेसाठी दाखल झाले होते. यावेळी अनेक भाविकांनी भाविकांनी जागरण करून कुलाचार पूर्ण करून श्री खंडोबा देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी गडावर रांजणी वळती येथील खुडे बंधूंच्या काठीपालख्या वाजत गाजत आल्या.

यात्रेच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाख भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांग, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियंत्रणाची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त गडावर ठेवण्यात आला आहे.

थापलिंग गडावर जिलेबी, भजी, हॉटेल, रसवंतीगृहे, गरम कपड्यांची दुकाने, खेळण्याची दुकाने, आकाशी पाळणे, लहान मुलांसाठी पाळणे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी लावले आहेत.

रविवारी भरयात्रेचा दिवस असल्याने अजून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असून, संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन, ग््राामपंचायत व स्वयंसेवकांच्या सहकार्याने शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार पडावी. यासाठी थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नागापूर ग््राामस्थ अथक परिश्रम घेत आहेत.

यात्रेत धावले नवसाचे बैलगाडे

नागापूर (ता. आंबेगाव) येथील श्रीक्षेत्र थापलिंग गडावर पौष पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. यात्रेच्या पहिल्या दिवशी नवसाचे 200 बैलगाडे धावले. रविवारी भरयात्रेच्या दिवशी उर्वरित गाडे धावणार असल्याची माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली. थापलिंग यात्रेच्या दोनही दिवस नवसाचे बैलगाडे पळवले जातात. ही जुनी परंपरा आहे. या यात्रेत बैलगाडामालकांना कोणताही इनाम, बक्षीस दिले जात नाही. बैलगाडामालक केवळ श्रद्धेपोटी नवसपूर्तीसाठी बैलगाडे पळवतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे बैलगाडे टोकन पद्धतीने घाटात पळवले जातात. यंदा दोन्ही दिवसांसाठी सुमारे 450 बैलगाडामालकांनी नोंदणी केली आहे. यापैकी पहिल्या दिवशी 200 बैलगाडे घाटात सोडण्यात आले. थापलिंग यात्रेत नवसाचे बैलगाडे पाहण्यासाठी बैलगाडा शौकीन मोठी गर्दी करत असतात. बैलगाडा घाटात श्री थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम बैलगाडामालक, शौकीन, यात्रेकरूंचे स्वागत करत आहे. धावत्या बैलगाड्यांचे समालोचन जिल्ह्यातील नामवंत समालोचक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT