

ओतूर : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील तीर्थक्षेत्र खामुंडी (ता. जुन्नर) येथील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ हे पुणे, ठाणे व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. नवसाला पावणारे नाथ अशी ख्याती असलेल्या या देवस्थानाची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, दोन भाविक तरुणींचे पोलिस भरतीचे स्वप्न पूर्ण झाल्याचा अनुभव येथे समोर आला आहे.
श्री काळभैरवनाथांच्या कृपाशीर्वादाने आपली इच्छा पूर्ण झाल्याच्या भावनेतून या दोन्ही अज्ञात भाविक तरुणींनी आपल्या मनातील भक्तिभाव व कृतज्ञता कागदावर लिहून चिठ्ठीच्या रूपाने नाथांच्या चरणी अर्पण केली. या दोन्ही विद्यार्थिनी कोण आहेत व कोठून आल्या याची माहिती उपलब्ध होऊ शकली नसली, तरी श्री क्षेत्र खामुंडी येथील देवस्थान नवसाला पावते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, भाविकांनी अशा प्रकारे चिठ्ठीद्वारे भक्तिभाव व्यक्त करण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष संदीप गंभीर यांनी दिली. यापूर्वीही अनेक भाविकांना श्री काळभैरवनाथांचा कृपाअनुभव आल्याने, नाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तसेच महामार्गालगत असलेल्या अत्यंत सुंदर कलाकृतीने नटलेल्या भव्य व सुबक मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
मंदिर परिसरातील कमालीची स्वच्छता, भव्य व देखणे मंदिररूप, तसेच नैसर्गिक व शांत वातावरण यामुळे खामुंडी गाव उत्तर पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील भाविक व पर्यटकांना आकर्षित करत आहे.