Shravan To Diwali Festivals Pudhari
पुणे

Shravan To Diwali Festivals 2026: श्रावणापासून सणांची पर्वणी; गणेशोत्सव, नवरात्र अन् दिवाळीचा जल्लोष

१३ ऑगस्टपासून श्रावण मासारंभ; कार्तिकी एकादशीपर्यंत चार महिने भक्ती, उत्साह आणि मांगल्याचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: चातुर्मासाला २५ जुलैपासून सुरुवात झाली असली, तरी धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांच्या खऱ्या पर्वणीला आता श्रावण महिन्यापासून सुरुवात होणार आहे. गुरुवारपासून (दि. १३) श्रावण मासारंभ होत असून, त्यानंतर नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी अशा सणांची मालिकाच सुरू असणार आहे.

श्रावणापासून कार्तिकी एकादशीपर्यंत तब्बल चार महिने भक्ती, उत्साह आणि मांगल्याचे वातावरण अनुभवायला मिळणार असून, त्यामुळे घराघरांत चैतन्यपूर्ण वातावरण, तर बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येणार आहे. सणांच्या मालिकेची सांगता २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीने होणार आहे. त्यामुळे श्रावणापासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा काळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.

श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीत विशेष धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात विविध व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा आणि धार्मिक उपक्रमांना सुरुवात होते. श्रावण महिना सण-उत्सवांचा असणार असून, यानिमित्ताने घराघरांत तयारीही सुरू झाली आहे. श्रावणी सोमवारला भगवान शंकराची उपासना होणार आहे, तर मंगळवारी मंगळागौरचे कार्यक्रम ठिकठिकाणी रंगणार आहेत. तर, श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेसह घरोघरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. १७ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाणार असून, त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी होईल. त्यामुळे श्रावण महिन्यातील धार्मिक वातावरण अधिकच बहरणार आहे.

गणेशोत्सवाने अन्‌ नवरात्रोत्सवाने वाढणार उत्साह

श्रावण आणि त्यानंतरच्या सणांच्या मालिकेत सर्वाधिक उत्सुकता असते ती गणेशोत्सवाची. १४ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी असून, या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीच्या उपासनेसह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी दसरा साजरा होणार आहे.

नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा प्रकाशोत्सव

नवरात्र आणि दसऱ्यानंतर अवघ्या काही दिवसांत दिवाळीचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळीचा दीपोत्सव साजरा होणार असून, ८ नोव्हेंबरला नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असेल. दिवाळीच्या विविध दिवसांमुळे घराघरांत उत्साह असणार आहे.

श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या व्रत-वैकल्यांना आणि सणांना भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. सण-उत्सवांमुळे घराघरांतील वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे असते. यंदा अधिक मास आल्यामुळे श्रावण, भाद्रपद आणि आश्विन महिन्यातील सण-उत्सव गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण १८ ते २० दिवसांनी उशिरा असणार आहेत. त्यामुळे सणांच्या तारखांमध्येही फरक पडला आहे. अधिक मासामुळे यंदा सण-उत्सवांचे वेळापत्रक पुढे सरकले आहे.
मोहन दाते, पंचांगकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT