

कोरेगाव भीमा: आपटी (ता. शिरूर) येथून घरातून बाहेर पडलेल्या २५ वर्षीय महिलेचा मृतदेह पाच दिवसांनी भीमा नदीच्या पात्रात सापडला. निकिता अविनाश गाडेकर (वय २५, रा. आपटी, ता. शिरूर) असे मृत महिलेचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत तिचा शोध घेतला.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ४) दुपारी एकच्या सुमारास निकिता अविनाश गाडेकर या 'ब्लाऊज घेऊन येते' असे सांगून घरातून बाहेर पडल्या. मात्र, त्या परत न आल्याने त्यांचे पती अविनाश भगवान गाडेकर (वय ३०) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.
त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, भीमा नदीच्या काठावर जनावरे चारणाऱ्या काही गुराख्यांनी संबंधित वर्णनाची महिला वढू बुद्रुक येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारताना दिसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार अग्निशामक दल आणि शिक्रापूर पोलिसांनी भीमा नदीचे पात्र पिंजून काढले; मात्र, महिलेचा ठावठिकाणा लागला नाही.
पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारेही शोध घेण्याचा प्रयत्न केला. रविवार (दि. ९)पर्यंत मोबाईलची रिंग वाजत असल्याने महिला जिवंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव भीमा येथील फडतरे वस्तीसमोर भीमा नदीच्या पात्रातील काठावरील काटेरी झाडाझुडपांमध्ये निकिता यांचा मृतदेह आढळून आला.
ही माहिती पोलिस हवालदार श्रावण गुपचे यांनी दिली. पुढील तपास शिक्रापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गुपचे करीत आहेत.