पुणे

उन्हाळ्यामुळे शिबिरे घटल्याने रक्ताचा तुटवडा

अमृता चौगुले

अनिल सावळे पाटील

जळोची : उन्हाची तीव्रता, लग्नसराई, कोरोनानंतर सुरू झालेले पर्यटन, गावातील यात्रा, यामुळे रक्तदान शिबिरे थंडावली आहेत.
सण-उत्सव जयंती, स्थानिक नेत्यांचे वाढदिवस व महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिरे तरुण मंडळे, संस्था व क्लबकडून घेतली जातात. यंदा तीव— उन्हाळ्यामुळे व सुट्यांमुळे शिबिरांची संख्या कमी झाली आहे. रक्तसंकलन घटल्याने सध्या ए, एबी पॉझिटिव्ह आणि सर्व निगेटिव्ह रक्तगटांचा तुटवडा जाणवत आहे.

कर्तव्यभावनेतून दात्यांनी सोयीनुसार रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे. रक्ताच्या तुटवड्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून रक्त आणण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तटंचाई आहे. यावरून वादावादीचे प्रसंग घडत आहेत. उन्हाळ्यात संकलन नेहमीपेक्षा 30 ते 50 टक्क्यांनी घटले आहे. फलटण, इंदापूर, दौंड, कर्जत, जामखेड, माळशिरस आदी परिसरातील रक्तपेढ्यांमध्ये विविध गटांतील रक्तसाठा उपलब्ध नसल्याने बारामतीत आलो, तर इथेही टंचाई असल्याचे रुग्णाचे नातेवाईक महेश शिंदे यांनी सांगितले.

बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांमध्ये रक्तदानासाठी जनजागृती असल्याने रक्तदान शिबिरे वारंवार होतात. सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यांमधून बारामतीमधील रक्तपेढीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. मे महिन्यात संकलन कमी झाले आहे. रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन स्व. माणिकभाई सराफ रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांनी केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT