शंकर कवडे
पुणे: शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसराची अवस्था दिवसेंदिवस बकाल होत चालली असून, न्यायाच्या मंदिरालाच आता दुर्लक्षाची झळ बसल्याचे चित्र आहे. एकेकाळी हिरवागार, स्वच्छ आणि देखणा म्हणून ओळखला जाणारा हा परिसर सध्या वाढलेल्या गवताने, तुंबलेल्या ड्रेनेजने, साचलेल्या चिखलाने, कुजणाऱ्या कचऱ्याने आणि बांधकामांच्या राडारोड्याने विद्रूप झाला आहे. शेकडो वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आणि नागरिक दररोज या परिस्थितीचा सामना करत आहेत.
न्यायालयाच्या मुख्य इमारतीसमोरील हिरवळ कोमेजली आहे, तर काही ठिकाणी गवत इतके वाढले आहे, की नागरिकांना तेथे बसणेही शक्य होत नाही. तसेच अनावश्यक ठिकाणीही झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. झाडे, वेली आणि हिरवळीची नियमित देखभाल बंद पडल्याने न्यायालयाचा निसर्गरम्य चेहराच हरवला आहे. पावसामुळे वाहून आलेली माती आणि चिखल रस्त्यांवर साचल्याने परिसर निसरडा बनला आहे.
अनेक ठिकाणी घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नवीन इमारतीसमोरील लिफ्टचे काम अर्धवट अवस्थेत असून, कामानंतरचा राडारोडा तसाच पडून आहे. ड्रेनेजची स्वच्छता वेळेवर होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. वकील आणि पक्षकारांना दुर्गंधीयुक्त पाण्यातून न्यायालयात जावे लागत आहे. अनेक ठिकाणी पालापाचोळा, खरकटे अन्न आणि इतर कचरा साचून कुजत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी ठेवलेल्या कचरापेट्याही निष्क्रिय अवस्थेत पडून आहेत.
न्यायालय म्हणजे केवळ इमारत नसून न्यायव्यवस्थेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. न्याय मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकावर न्यायालयाच्या परिसराची पहिली छाप पडते. परिसरात अस्वच्छता, वाढलेले गवत, साचलेले पाणी आणि अपूर्ण कामे दिसत असतील, तर त्यातून प्रशासनाबाबत चुकीचा संदेश जातो. न्यायालय प्रशासनाने नियमित देखभाल, बागांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारून या परिसराचे हरवलेले वैभव पुन्हा मिळवून द्यावे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला दोनदा अर्ज देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.ॲड. राकेश सोनार.
न्यायालयातील स्वच्छता आणि सुरक्षितता ही केवळ सौंदर्याची बाब नाही, तर न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे. पावसाळ्यात चिखल, सांडपाणी आणि राडारोड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित विभागांनी एकत्रित कृती आराखडा तयार करून न्यायालय परिसर पुन्हा स्वच्छ, सुरक्षित आणि हिरवागार करावा.ॲड. अमेय बलकवडे