निमोणे: एकदा का घोडा मिळाला की त्याला मी ठोकलाच... भाई व्हायचंय मला... गुन्हेगारीच्या जोरावरती आपलं स्वतःच विश्व निर्माण करण्याचा चंग बांधणाऱ्या गुंडांवर शिरूर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत मागील दीड वर्षात 16 गुंडांना अटक करत 21 गावठी कट्टे जप्त केले आहेत, असे शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यामध्ये वाढत्या औद्योगिकरणामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील अनेक पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. मध्य प्रदेशातून खांडवा, धुळे मार्गे हे गुन्हेगार गावठी कट्टे पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात विकत असल्याची कुणकुण पुणे ग््राामीण पोलिस दलाला वेळोवेळी लागल्यामुळे पोलिस दलाकडूनही दक्षता घेतली जात आहे.
वाढत्या औद्योगिकरणामुळे ठेकेदारीमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. मनगटाच्या आणि दहशतीच्या जोरावर भंगार, कामगार, वाहतूक ठेका जर आपण मिळूवू शकलो तर आपण खोऱ्याने पैसा ओढू या स्वप्नात जगणाऱ्या अनेकांनी स्थानिक पातळीवर गुन्हेगारी टोळ्या तयार करून दहशत निर्माण करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. प्रतिस्पर्ध्यावर वरचढ होण्यासाठी आपल्याजवळ घातक शस्त्रे असावी यासाठीच शिरूर तालुक्यातील अनेक गुन्हेगारांनी मध्य प्रदेश परिसरातील गुन्हेगारांशी संधान बांधून गावठी कट्टे हस्तगत केले आहेत. पुणे-नगर रस्त्यावरील महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या शिरूर शहरात मागील वर्षी बारा गावठी कट्टे सापडले.
वेगवेगळ्या पाच गुन्ह्यात नऊ आरोपी निष्पन्न झाले तर चालू वर्षी वेगवेगळ्या सात गुन्ह्यांत 9 गावठी कट्टे व 19 काडतूस शिरूरच्या तपास पथकाने पकडले आहेत. विशेष म्हणजे पोलिस दलाकडून मिळालेल्या विश्वासनीय माहितीनुसार जे 16 आरोपी गावठी कट्ट्यासह गजाआड करण्यात आले त्यातील बहुतांशी जणांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी नव्हती, तरीही हे आरोपी गावठी कट्ट्याच्या मोहात कसे पडले हा प्रश्न ऐरणीवरती आला आहे.
शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस अंमलदार नितेश थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, नीरज मिसाळ, निखिल रावडे, अंबादास थोरे, अजय पाटील या पथकाने शिरूर शहर, रामलिंग, आमदाबाद फाटा, वडगाव रासाई आदी परिसरात छापा टाकून गावठी कट्ट्यांसह आरोपी जेरबंद केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाकडून अग्निशस्त्रांचा व्यापार उद्ध्वस्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.