Pune District Cooperative Bank Pudhari
पुणे

Pune District Bank Election: शिरूरमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली; १३१ ठरावांमुळे इच्छुकांची संख्या वाढली

अजितदादांच्या छत्रछायेशिवाय पहिली निवडणूक; अशोक पवारांसह अनेक दिग्गजांची नावे चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: मागील ३५ वर्षांपासून शिरूर तालुक्यामधून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेला जाणारा संचालक हा अजितदादांच्या विचारांचा असायचा. भलेही स्थानिक पातळीवर दोन गटात कितीही कडवा संघर्ष होऊ दे; मात्र विजयी झालेला उमेदवार हा अजितदादा पवारांच्या छत्रछायेखालीच आश्रय घेत असल्याने जिंकून येईल तो आमचा, हे समीकरण चालत आले होते.

दादा नावाचा धाक नसताना होणारी ही पहिली निवडणूक अनेकांची कसोटी पाहणारी ठरणार आहे. जिल्हा बँकसाठी तालुक्यातून १३१ मतदार प्रतिनिधी ठराव गेले आहेत; त्यामध्ये ४६ ठराव हे तालुक्याच्या आणि गावगाड्यांच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका निभावणाऱ्या मातब्बरांचे असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात कधी कोणाची 'एंट्री' होईल हे सांगणे अवघड झाले आहे.

वरवर पाहता विद्यमान संचालक माजी आमदार अशोक पवार, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद, कोंढापुरीचे माजी सरपंच व दिवंगत बँकेचे संचालक अरुण आबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निल गायकवाड, जि. प. सदस्य प्रफुल्ल शिवले आदींची नावे पहिल्या टप्प्यात संभाव्य उमेदवार म्हणून चर्चिली जात आहे; मात्र तालुक्याच्या राजकारणामध्ये मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या पवार, गावडे, पाचर्णे घराण्याबरोबरच राहुल गवारे, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, आबासाहेब सोनवणे, आप्पासाहेब बेनके याही मंडळींचा ठराव बँकेसाठी आल्याने ऐनवेळी काहीही घडू शकते, असंही बोलले जात आहे

सर्वात जास्त २९ सहकारी संस्थाचे ठराव मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटात आहेत. त्या खालोखाल २४ ठराव तळेगाव जिल्हा परिषद गटात आहेत. टाकळी हाजी २२ ठराव, न्हावरे जिल्हा परिषद गट १८ ठराव तर केंदूर पाबळ व रांजणगाव गणपती या दोन्ही जिल्हा परिषद गटात प्रत्येकी १७ ठराव आहेत. शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात पाच ठराव आहेत. मागील ३० वर्षांचा इतिहास पाहिला असता तळेगाव, कोंढापुरी, विठ्ठलवाडी या परिसरातच जिल्हा बँकेचे संचालक पद राहिले. अपवाद विद्यमान जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात माजी आमदार अशोक पवार यांची वर्णी लागली.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एक मोठा गट अजितदादांबरोबर ती गेला आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून माजी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते मात्र अनेक जण इच्छुक असल्याने हा ताळमेळ घालताना विद्यमान आमदार माऊली कटके यांना तारेवरची कसरत करावी लागेल. दादांच्या पश्चात होणारी ही पहिली निवडणूक जो निवडून येईल तो आपला या तत्त्वाला 'फुल स्टॉप' देणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गटाला आपली मोट विस्कटून न देता मित्र पक्षाला विश्वासात घेऊन वाटचाल करावी लागेल तर माजी आमदार अशोक पवार यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या काळात जे राजकीय शहाणपण दाखवले त्याची पुनरावृत्ती करत काही धाडसी निर्णय घेतला, तर निवडणूक रंजक वळणावर जाईल हे मात्र नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT