अभिजित आंबेकर
शिरूर : शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडली असून, महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढत दिली, तर महाविकास आघाडीने आपले ऐक्य राखण्यात यश मिळविले, तर उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, या राजकीय समीकरणामुळे निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.
नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत असून, नगरसेवकाच्या 24 जागांसाठी बहुतांश ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती पाहावयास मिळाल्या आहेत.
नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने या ठिकाणी पंचरंगी लढत झाली. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अलका सुरेश खांडरे, भारतीय जनता पार्टीच्या सुवर्णा राजेंद्र लोळगे, शिवसेना शिंदे गटाच्या रोहिणी किरण बनकर व अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष वैशाली दादाभाऊ वाखारे यांच्यात प्रामुख्याने लढत झाली.
राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि भारतीय जनता पक्षाने नगरसेवकपदासाठी संपूर्ण पॅनेल उभा केला होता. यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग््रेास यांची आघाडी होती. या महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग््रेासला प्रत्येकी दोन व एक अशी जागा देण्यात आल्याने महाविकास आघाडीने 24 पैकी 23 जागा व नगराध्यक्षपदाची जागा लढवली आहे.
विधानसभेच्या यशानंतर महायुतीत शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीनिमित्त फाटाफूट झालेली दिसून आली. राष्ट्रवादी अजित पवार, शिवसेना शिंदे गट व भाजपा हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने नगराध्यक्षासह 24 उमेदवार या पक्षाने दिले, तर भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदासह 22 जागांवर इतके उमेदवार दिले तर शिंदे गटाने नगराध्यक्ष आणि पाच इतके उमेदवार दिले. त्यामुळे महायुतीतील घटकपक्षच एकमेकांविरोधात लढल्याने त्याचा निकालावर काय परिणाम होतो का? हेसुद्धा पाहणे गरजेचे आहे.
निवडणुकीत विद्यमान आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची बाजू सांभाळली, तर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाची बाजू माजी आमदार अशोक पवार यांनी सांभाळली, तर भाजपच्या वतीने ज्येष्ठ नेत्या जयश्री पलांडे, मंडल अध्यक्ष राहुल पाचर्णे, भाजपचे पुणे जिल्हा संघटक ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी प्रचाराची बाजू सांभाळली. उद्योगपती प्रकाश धारीवाल या निवडणुकीत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांना प्रथमच शिरूरमध्ये संधी मिळाली आहे. नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत 32993 एवढे मतदार होते. या निवडणुकीत पुरुष 11762 व महिला 11710 एकूण 23 हजार 472 मतदारांनी हक्क बजावला. 71.14 मतदान शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त झाले आहे.