Shirur Karegaon Murder Pudhari
पुणे

Shirur Crime: शिरूरच्या कारेगावात पाण्याच्या प्लँटमध्ये गोळी झाडून कामगाराची हत्या

हामजा शेख यांचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह; अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा, तपासासाठी चार पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

शिरूर: कारेगाव (ता. शिरूर) येथील साईनगर परिसरात पाण्याच्या प्लँटमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख (वय ३९) यांची पिस्तुलातून गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) सकाळी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हामजा शेख हे विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या पाण्याच्या प्लँयमध्ये काम करीत होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास ते कामावर गेले. सुमारे पावणेसात वाजता शेजारील महिलेने त्यांच्या पत्नीला हामजा प्लँटमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून शिरूर येथील हॉस्पिटलमध्ये नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शिरूर ग्रामीण रुग्णालयातील प्राथमिक तपासणीत त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम आणि आरपार छिद्र असल्याचे आढळले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांच्या घटनास्थळ पाहणीत पाण्याच्या प्लँटमध्ये गोळीची पुंगळी आढळली. घटनास्थळाजवळ काही वेळापूर्वी फटाका फुटल्यासारखा मोठा आवाज ऐकू आल्याचेही एका महिलेने सांगितले.

याबाबत हामजा यांच्या पत्नी अबिताबी हामजा शेख (वय ३७, सध्या रा. कारेगाव, साईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रांजणगाव पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरडे करीत आहेत. हत्येमागील कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची चार पथके तयार केल्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT