Guns Pudhari
पुणे

Shirur Firing Incidents: शिरूर तालुक्यात सहा महिन्यांत गोळीबाराच्या पाच घटना; तीन जणांचा मृत्यू

क्रिकेटचा वाद, पूर्ववैमनस्य ते आर्थिक कारणांपर्यंत विविध घटनांत शस्त्रांचा वापर; अवैध शस्त्रांच्या पुरवठ्याच्या साखळीवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

शिरूर: शांत, शेतीप्रधान अशी शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या घटनांमुळे बदलत चालली आहे. मागील सहा महिन्यांत तालुक्यात गोळीबाराच्या पाच घटना, या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर एका घटनेत तरुण बचावला. याच काळात रांजणगाव गणपती येथील गंभीर मारहाणीच्या घटनेतही एका व्यक्तीचा मृत्यू झाला. किरकोळ वाद, जुने वैमनस्य आणि टोळीयुद्ध आता थेट रक्तपातापर्यंत पोहोचत असल्याचे भयावह चित्र शिरूर तालुक्यात समोर आले आहे.

क्रिकेटच्या वादापासून सुरू झाली गोळीबाराची मालिका

२९ मार्च २०२६ रोजी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेटच्या वादातून गोळीबार झाला. काही वर्षांपूर्वीपर्यंत तरुणांच्या भांडणात शिवीगाळ, हाणामारी किंवा दगडफेक होत असे; आता मात्र वाद मिटविण्यासाठी थेट बंदुकीचा वापर होऊ लागल्याने परिस्थिती किती गंभीर झाली आहे, याचा अंदाज येतो, त्यानंतर १ जून २०२६ रोजी करडे घाटात टोळीयुद्धातून झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. रस्त्यावर अडवून केलेल्या हल्ल्याने तालुक्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाडस किती वाढले आहे, हा प्रश्न उपस्थित झाला.

१८ जुलै २०२६ पुन्हा करडे येथेच जुन्या वादातून गोळीबार झाला. एका तरुणावर दोन राउंड झाडण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. जीव वाचविण्यासाठी संबंधित तरुणाने तलावात उडी घेतल्याने तो बचावला. या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले. १८ सप्टेंबर २०२६ रोजी शिरूर शहरात किरकोळ आर्थिक वादातून दिवसाढवळ्या गोळीबार झाला आणि एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. म्हणजेच आता शिरूर तालुक्यात एखादा वाद झाला की त्याचा शेवट चर्चेत, मध्यस्थीत किंवा मारामारीत न होता थेट गोळीबारात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शिरूरनंतर रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत गोळीबाराची घटना

रांजणगाव गणपती येथे १८ सप्टेंबर २०२६ वामन वाईन्स परिसरात पूर्वीच्या भांडणातून झालेल्या गंभीर मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. गोळीबार नसला तरी हिंसाचाराची तीव्रता दाखविणारी ही घटना तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी वातावरणाकडे बोट दाखवते. त्यानंतर दि २९ सप्टेंबर २०२६ कारेगाव येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

'दोन दिवसांत जामीन'मुळे कायद्याचा धाक कमी होतोय?

शिरूर तालुक्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना काही प्रकरणांत लवकर जामीन मिळत असल्याची दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात काही टोळ्यांकडून अल्पवयीन मुलांचा भांडणात किंवा हाणामारीत जाणीवपूर्वक वापर केला जात आहे. तसेच, अनेक वेळा अल्पवयीन मुलांच्या हातात शाळेतल्या पुस्तकाऐवजी कोयता, तलवार अन‌् गावठी कट्ट्यासारखे अवैध शस्त्र दिसत आहे.

पुढची गोळी सुटण्याची वाट पाहणार का?

सहा महिन्यांत पाच गोळीबाराच्या घटना आणि त्यात तीन मृत्यू ही आकडेवारी दुर्लक्षित करण्यासारखी नाही. आज क्रिकेटच्या वादातून गोळीबार होतो, उद्या टोळीयुद्धातून, तर परवा किरकोळ आर्थिक वादातून एखाद्याचा जीव जातो. वादाचे कारण छोटे; पण परिणाम मात्र मृत्यू. आता पोलिसांसमोर केवळ आरोपी पकडण्याचे आव्हान नाही. तर शिरूर तालुक्यातील अवैध शस्त्रांची संपूर्ण साखळी उखडून काढण्याचे आव्हान आहे. गावठी कट्टा आणि पिस्तूल सहज उपलब्ध होत असतील, तर प्रश्न केवळ गुन्हेगारांचा नाही; प्रश्न आहे या शस्त्रांना बाजारपेठ कोण उपलब्ध करून देत आहे याचा. शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आता आश्वासन नको, तर अवैध शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याचे ठोस परिणाम दिसायला हवेत. कारण पुढची गोळी कोणावर चालेल, हे सांगता येणार नाही. पण, ती सुटण्याआधी प्रशासनाने जागे होणे

'कट्टा-पिस्तूल' आता गुन्हेगारांच्या खिशातून थेट तरुणांच्या हातात

या घटनांमधील सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे अवैध शस्त्रांची उपलब्धता, गावठी कट्टा किंवा पिस्तूल मिळविणे एवढे सोपे झाले आहे की क्षुल्लक वाद मिटविण्यासाठीही काही तरुण बंदूक घेऊन फिरू लागले आहेत. त्याहून गंभीर प्रश्न म्हणजे अल्पवयीन मुलांपर्यंत ही शस्त्रे सहज पोहोचत असतील, तर ती कोण पुरवत आहे ? शस्त्र विकणारा, पुरवठा करणारा आणि त्यामागील साखळी शोधल्याशिवाय केवळ गोळीबार करणाऱ्याला पकडून प्रश्न सुटणार नाही.

शस्त्र जप्त होते; पण शस्त्र पुरवणारा मात्र बाहेरच एखाद्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस तपास सुरू होतो, आरोपी पकडले जातात आणि गुन्हा दाखल होतो. पण, त्यानंतरचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न अनेकदा मागे पडतो. तो म्हणजे गोळी झाडणाऱ्याच्या हातात पिस्तूल आले कुठून? या शस्त्राचा पुरवठा करणारा कोण? शस्त्र तयार करणारा किंवा विकणारा कोण? त्यामागे स्थानिक टोळी आहे का? बाहेरील गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध आहेत का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहे.

पोलिस पडताळणीची यंत्रणा किती सक्षम?

रांजणगाव एमआयडीसीसह औद्योगिक पट्ट्याच्या विस्तारामुळे शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. विविध भागांतून कामासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे तालुक्याचे सामाजिक चित्र बदलले आहे. बाहेरून येणारा प्रत्येक नागरिक गुन्हेगार आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे; मात्र भाडेकरू, कामगार आणि संशयास्पद व्यक्तींची पोलिस पडताळणी किती प्रभावीपणे होते, हा मोठा यक्षप्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT