Road Pudhari
पुणे

Shirur Chakan Karjat Uran Corridor: शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण कॉरिडॉरला सरकारचा हिरवा कंदील

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी 135 किमी पर्यायी मार्ग; औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी ठाम भूमिका मांडली. शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण मल्टिनोडल कॉरिडॉर उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला आता राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही महिन्यांत अनेकवेळा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्तीकामांमुळे हजारो प्रवासी, नोकरदार आणि मालवाहू वाहनचालकांना तासन् तास अडकून पडावे लागले. या पार्श्वभूमीवर एकाच मार्गावर अवलंबून असलेली पुणे-मुंबई वाहतूकव्यवस्था असुरक्षित असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.

या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून सुमारे 135 किलोमीटर लांबीचा चारपदरी शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच नगर रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आमदार बाबाजी काळे यशस्वी ठरले आहे.

विशेष म्हणजे, या कॉरिडॉरमुळे शिरूर आणि चाकण एमआयडीसीतील औद्योगिक वाहतूक थेट उरण येथील बंदराशी (जेएनपीटी) जोडली जाणार आहे. त्यामुळे मालवाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. परिणामी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच नगर रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

आता या प्रकल्पाच्या मंजुरीनंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मुंबई-पुणे मार्गावरील वाढती वाहतूक आणि औद्योगिक विकास लक्षात घेता शिरूर-कर्जत-उरण कॉरिडॉर हा भविष्यातील दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पर्याय ठरणार असून, या प्रकल्पाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होते. याला पर्याय म्हणून सभागृहात नेहमीच या रस्त्यासाठी आग््राह धरला. हा रस्ता खेडसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्याचा फायदा होईल. यावर लवकरच योग्य निर्णय होईल. खेड तालुक्यासाठी हा रस्ता नक्कीच भाग्यरेषा ठरेल.
बाबाजी काळे, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT