Health Center Medicine Theft Pudhari
पुणे

Shetfalagade Health Center Medicine Theft: शेटफळगढे आरोग्य केंद्रातील औषध चोरी प्रकरण तापले; अदखलपात्र गुन्ह्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

सीसीटीव्ही फुटेजमधून औषधे नेल्याचा प्रकार उघड; राजकीय दबावाचा नागरिकांचा आरोप, सखोल तपासासाठी न्यायालयाची परवानगी घेणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे, प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोरगरिबांसाठी असलेली हजारो रुपयांची औषधे चोरलेली असताना या गंभीर घटनेला जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिसांकडून भिगवण पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न समोर आला आहे.

राजकीय दबावापोटी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचा आरोप नागरिकांनी करत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी न्यायालयीन परवानगीचा आधार घेत प्रशासकीय टोलवाटोलवी सुरू केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे नागरिकांना सांगून उपचारार्थ आलेल्या रुग्णांना माघारी पाठविण्यात आले.

मात्र, दोन दिवसांपूर्वी औषधे असताना अचानक औषधे संपल्याचे कारण समोर आल्याने नागरिकांना संशय आला. त्यामुळे काही नागरिकांनी अतीतातडीची सबब सांगून येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित कंत्राटी महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कारंडे या २ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास केंद्रातील औषधे पोत्यात भरून दुचाकी आणि चारचाकीत घेऊन जातानाचे आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

पूर्वकल्पना आणि दबाव

शेटफळगढे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल थोरात यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे ३ नोव्हेंबरला औषधांच्या साठ्यात तफावत आणि चोरी झाल्याबाबत तक्रार केली होती. मात्र, दखल घेतली नाही. तसेच, थोरात यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पावले उचलत असतानाच त्यांना स्थानिक जि. प. पदाधिकाऱ्यांनी अडवून दबाव त्यांचावर दबाव टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हजारोंची औषधे : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तक्रारीनुसार चोरीला गेलेल्या औषधांची यादी आणि त्यांची संख्या अशी यादी तक्रार अर्जासोबत जोडली होती. त्यामध्ये व्हीटॅमीन सी, ओआरएस, पल्स ऑक्सिमीटर, अल्बेंडाझोल, इजेक्शन, यंत्र, मलम आणि उपचारार्थ वस्तूंचा उल्लेख आहे. बाजारभावाप्रमाणे यांची किंमत हजारो रुपयांच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले.

प्रशासकीय यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह

चोरी करणाऱ्या महिला कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कारंडे यांना दि. २२ सप्टेंबरलाच जि.प.सीईओंनी निलंबित केले, तरी दीड महिना म्हणजे दि. १ नोव्हेंबरपर्यंत त्या कार्यरत कशा? तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येत असताना त्यांच्याकडूनही कारवाई का नाही? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

तालुका पातळीवर स्थापन केलेल्या समितीच्या निष्कर्षानुसार केवळ पाच हजार रुपयांचीच औषधे चोरीला गेली आहेत. पाच हजार रुपयांची आर्थिक नुकसान असल्याने पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणता गुन्हा दाखल करायचा हे पोलिसांचे काम आहे, माझे नाही.
डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे.
संबंधित घटनेबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस नियमानुसार पुढील कार्यवाही करतील.
गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडील प्राप्त तक्रारीनुसार पाच हजार रुपयांच्या आतील मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना आहे. त्यामुळे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेच्या खोलापर्यंत तपास करून गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेऊन पुढील तपास करण्यात येईल.
गणेश बिरादार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT