Sharad Pawar file photo
पुणे

Sharad Pawar: सोनम वांगचुक यांच्या अटकेवर शरद पवारांचा केंद्रावर हल्लाबोल; 'अटकेने आंदोलन दडपता येणार नाही'

बारामतीतून केंद्र सरकारवर टीका; संवादाऐवजी दडपशाहीचा आरोप, शेतकरी कर्जमाफीवरही आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

बारामती: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांना अटक होण्याची शक्यता होतीच पण सरकारने पहाटेच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले गेले. त्यांना अटक करून जनतेच्या प्रश्नांना दाबता येणार नाही, त्यांच्या मागण्यांमध्ये केवळ एका मंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा नव्हता, तर अनेक व्यापक प्रश्नांचा समावेश होता, अटक झाली तरी आंदोलन थांबणार नाही, असे खा. शरद पवार म्हणाले.

बारामतीत गोविंदबागेत बोलताना पवार यांनी , वांगचुक यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत सरकारने संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप केला. पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून वांगचुक यांना अटक होण्याची शक्यता होती आणि अखेर सरकारने पहाटेच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले. मात्र, एखाद्या व्यक्तीला अटक करून जनतेच्या प्रश्नांना दाबता येणार नाही. त्यांच्या मागण्यांमध्ये केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा मुद्दा नव्हता, तर अनेक व्यापक प्रश्नांचा समावेश होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांनी या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी गेले होते. तरीही केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांशी कोणतीही सकारात्मक चर्चा केली नाही. दिल्लीत आंदोलन सुरू असतानाही सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी भेट घेण्याचे टाळले, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

"सरकारला आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईमुळे आंदोलन संपणार नाही. लोकशाहीत प्रश्नांची उत्तरे संवादातून दिली पाहिजेत, अटक करून नाही," असे पवार म्हणाले. यावेळी शेतकरी कर्जमाफीबाबतही त्यांनी सरकारला इशारा दिला.

सरकारने दिलेल्या नव्या मुदतीपर्यंत आम्ही प्रतिक्षा करू. त्या कालावधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय झाला, तर स्वागतच आहे. मात्र, आश्वासन पूर्ण झाले नाही तर राज्यभर आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT