Pune Musical Shows: अभंगांचा गाभा समजण्यासाठी आयुष्यभर अभ्यास आवश्यक; निरूपणकार रवींद्र खरे यांचे मत

'वैकुंठीचा राया' कार्यक्रमाच्या निमित्ताने संत साहित्य, वारी परंपरा आणि अभंगांच्या गूढार्थावर सखोल भाष्य; २१ जुलैला बालगंधर्वमध्ये सांगीतिक मेजवानी
Vaikunthicha Raya
Vaikunthicha RayaPudhari
Published on
Updated on

पुणे: संतांच्या अभंगांचा खरा अर्थ केवळ शब्दांच्या पातळीवर समजून घेता येत नाही. त्या प्रत्येक अभंगामागे संतांचे जीवन, त्यांची साधना, अनुभूती आणि समाजाला दिलेला जीवन दृष्टिकोन दडलेला असतो. त्यामुळे संत साहित्याचा गाभा समजून घेण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, चिंतन आणि मनन आवश्यक आहे. अनेक वर्षे अभंगांचा अभ्यास केल्यानंतर त्यातील अर्थाचे नवे-नवे पैलू उलगडत जातात, अशी भावना ज्येष्ठ निरूपणकार आणि रंगकर्मी रवींद्र खरे यांनी व्यक्त केली.

आषाढी एकादशीनिमित्त 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या 'वैकुंठीचा राया' या विशेष सांगीतिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'पुढारी'शी संवाद साधला. संतसाहित्य, अभंगवाणी, भक्ती, वारी परंपरा आणि निरूपण या विषयांवर त्यांनी सविस्तरपणे आपले विचार मांडले. 'वैकुंठीचा राया' हा विशेष सांगीतिक कार्यक्रम मंगळवारी (दि. २१ जुलै) सायंकाळी पाच वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला आहे. 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या, विशाल चुगेरा प्रॉपर्टीजने प्रस्तुत केलेल्या आणि सणस ग्रुप समर्थित (पॉवर्ड बाय) असलेल्या या कार्यक्रमात रसिकांना संतांचे निवडक अभंग ऐकायला मिळणार आहेत. ज्येष्ठ गायक पं. यादवराज फड आणि गायक सुनील पासलकर हे संतांचे अभंग सादर करणार आहेत. तर, रवींद्र खरे कार्यक्रमाचे निरुपण करणार आहेत. कोहिनूर ग्रुप आणि फोनिक्स लँडमार्क हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे को-पॉवर्ड बाय पार्टनर असून, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (मल्टिस्टेट) हे फायनान्स पार्टनर आहेत. चाटे ग्रुप एज्युकेशन पार्टनर, तर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) हे डेअरी पार्टनर आहेत.

खरे म्हणाले, की संतसाहित्याचे निरूपण ही अत्यंत जबाबदारीची प्रक्रिया आहे. अभंगातील शब्दांचा सरळ अर्थ सांगणे ही निरूपणाची सुरुवात असली, तरी ती अंतिम पायरी नाही. त्या शब्दांचा जन्म ज्या आध्यात्मिक अनुभूतीतून झाला, ती अनुभूती समजून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक निरूपणकाराने करायला हवा. संतांनी जे अनुभवले, त्याचा अंश जरी आपल्या मनापर्यंत पोहोचला, तरी अभंगातील गुढार्थ उलगडू लागतो. प्रत्येक निरूपणकार आपल्या अभ्यास, अनुभव, विचारशक्ती आणि जीवनदृष्टीच्या आधारे अभंगांचा अर्थ स्पष्ट करतो. त्यामुळे प्रत्येकाची मांडणी वेगळी असू शकते. अंतिम सत्य कोणाकडेच पूर्णपणे नसते; मात्र, सातत्याने चिंतन, अभ्यास आणि साधना केली, तर त्या सत्याच्या अधिक जवळ जाता येते. म्हणूनच संत साहित्याचा अभ्यास हा आयुष्यभर चालणारा प्रवास आहे.

संतांच्या अभंगांचे वैशिष्ट्य सांगताना खरे म्हणाले, की अभंगांमध्ये केवळ अध्यात्म नाही, तर जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. माणसाने संकटांना कसे सामोरे जावे, समाजाशी कसे वागावे, अहंकारापासून कसे दूर राहावे, प्रेम, समता आणि करुणा यांचा स्वीकार कसा करावा, याचे मार्गदर्शन संतांनी आपल्या रचनांतून केले आहे. त्यामुळे अभंग हे केवळ गाण्यासाठी नसून जगण्यासाठी आहेत.

'मला काय मिळाले'

वारी परंपरेविषयी बोलताना त्यांनी 'वारी' या शब्दाचा व्यापक अर्थ स्पष्ट केला. त्यांच्या मते, वारी म्हणजे केवळ दर वर्षी पंढरपूरला जाण्याचा धार्मिक प्रवास नाही. जीवनातील दुःख, वेदना, संकटे आणि अहंकार यांपासून मुक्त होऊन अंतर्मनाच्या शुद्धीकडे नेणारी ही जीवनयात्रा आहे. वारंवार केली जाते म्हणून वारी, ही व्याख्या खरी असली, तरी माणसाला आतून बदलणारी आणि अधिक संवेदनशील बनविणारी ही प्रक्रिया अधिक महत्त्वाची आहे. 'मला काय मिळाले' या भावनेने वारी अनुभवली, तर तिचा आत्मिक आनंद सहज प्राप्त होतो, असे त्यांनी नमूद केले.

निस्‍वार्थ सेवाभावातच पांडुरंगाचे दर्शन

वारकरी संप्रदायातील सेवाभावाचे एक हृदयस्पर्शी उदाहरणही त्यांनी सांगितले. नातेपुते येथे निरूपणासाठी जात असताना वारीमुळे सर्व रस्ते बंद झाले होते. त्या वेळी एसटीचालक प्रकाश कांबळे यांनी स्वतःच्या मोटरसायकलवरून त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचविले. त्यानंतर घरी नेऊन जेवण आणि चहाची व्यवस्था केली. त्याबदल्यात पैसे देण्याचा आग्रह केला असता, ''तुम्हाला पोहोचवणे हीच पांडुरंगाची सेवा,'' असे त्यांनी नम्रपणे उत्तर दिले. त्या प्रसंगातून वारकऱ्यांच्या निस्वार्थ सेवाभावातच पांडुरंगाचे दर्शन घडल्याचा भावनिक अनुभव खरे यांनी सांगितला.

'पुढारी' माध्यम समूहाचे कौतुक

'वैकुंठीचा राया' या कार्यक्रमाबद्दल बोलताना त्यांनी 'पुढारी' माध्यम समूहाचे विशेष कौतुक केले. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक करणारे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत. संत साहित्य, अभंग आणि भक्ती परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमांनी केले, तर समाज अधिक संवेदनशील आणि मूल्याभिमुख बनेल. अशा कार्यक्रमांमुळे भक्तीची वारी अधिक व्यापक होईल आणि आपण या कार्यक्रमाचा भाग असल्याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका येथे मिळतील

  • दैनिक ‘पुढारी’ कार्यालय, मित्रमंडळ चौक - सकाळी १० ते सायं. ६.

  • देसाई बंधू आंबेवाले, कर्वे रस्ता

  • ग्राहकपेठ, टिळक रस्ता

  • अमराळे ज्वेलर्स, कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता

  • मोदीकेअर दालन, सक्सेस स्क्वेअर सोसायटी, महर्षी कर्वे पुतळ्याजवळ, कोथरूड

  • पूना गेस्‍ट हाऊस, बेलबाग चौकाजवळ, लक्ष्मी रस्‍ता

कार्यक्रम कधी-कुठे?

  • दिनांक : मंगळवार, २१ जुलै

  • वेळ : सायंकाळी ५ वाजता

  • स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर,

  • जंगली महाराज रस्ता, पुणे

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. समता, बंधुता, शिस्त, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारी ही वारी समाजाला सकारात्मक दिशा देणारी आहे. विविध जाती-धर्म, भाषा आणि प्रदेशातील लोक या सोहळ्यात सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवतात. ही परंपरा भावी पिढ्यांपर्यंत अधिक जोपासली जावी आणि संतांचे विचार समाज जीवनात अधिक दृढ व्हावेत, हीच आषाढी वारीनिमित्त सदिच्छा.

कृष्णकुमार गोयल, चेअरमन, कोहिनूर ग्रुप

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि संतपरंपरेचा अमूल्य वारसा आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणातून समता, बंधुता, सेवा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून, समाजाला सकारात्मक दिशा देणारी लोकचळवळ आहे. संतांच्या विचारांचा वारसा जपत ही परंपरा भावी पिढ्यांपर्यंत अधिक बळकटपणे पोहोचावी, हीच आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रार्थना. सर्व वारकरी आणि नागरिकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

सुनील राठोड, चेअरमन, फिनिक्स लँडमार्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news