Sharad Pawar file photo
पुणे

Sharad Pawar: ‘सन १९९४ पासून सत्तेत, मग आरक्षणासाठी काय केले?’; राधाकृष्ण विखेंवर शरद पवारांचा घणाघात

मराठा आरक्षणावरून विखे पाटलांना सवाल; राज्य-देशाच्या अर्थव्यवस्थेसह साखर आयातीच्या निर्णयावरही सरकारला धारेवर धरले

पुढारी वृत्तसेवा

बारामती: मराठा आरक्षण प्रश्नी खा. शरद पवार यांच्याकडे बोट दाखविणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पवार यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला. सन १९९४ पासून आजपर्यंत तुम्ही काय करत आहात? आजपर्यंत तुम्ही सत्तेमध्येच आहात ना, असा खडा सवाल पवार यांनी केला. शिवाय त्यांच्या टीकेला आपण महत्त्व देत नसल्याचेही पवार म्हणाले. बारामतीत खा. पवार हे पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षण प्रश्नी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषण करत आहेत, याबाबत पवार म्हणाले, काही मंत्री तिथे आज जात आहेत. ते काय निर्णय सांगणार आहेत ते पाहिले पाहिजे.

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना पवार यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत. सरकारने स्वीकारलेले धोरण चुकीचे असल्याचे न्यायव्यवस्थेने स्पष्ट केले आहे. न्यायव्यवस्थेने सरकारला एक प्रकारे कठोर शब्दांत इशारा दिला आहे. प्रशासन आणि न्यायव्यवस्थेच्या भूमिकेबाबत आज निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक असल्याचेही पवार म्हणाले.

पंतप्रधानांना निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार असून, त्यासाठी १६ ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्याच्या तारखेत पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. बारामतीत उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संस्थेची पंतप्रधान मोदी पाहणी करणार असून, यावेळी त्यांना संस्थेचे सविस्तर प्रेझेंटेशन देण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. आमच्या काही लोकांनी सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांना या संस्थेबाबत प्रेझेंटेशन दिले होते. मात्र, त्यांना हा विषय सविस्तरपणे समजून घ्यायचा आहे. त्यामुळे बारामतीतील प्रस्तावित कार्यक्रमात त्यांना या संस्थेचे सविस्तर सादरीकरण करण्यात येणार आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.

अर्थव्यवस्था अडचणीत

राज्यातील वाढती महागाई आणि आर्थिक परिस्थितीवरही पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्याची आणि देशाची अर्थव्यवस्था अडचणीत जात असून महागाई वाढत आहे. कुटुंबप्रमुखांना दैनंदिन गरजांची पूर्तता करणेही अवघड होत चालले आहे. मात्र, या मूळ प्रश्नांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी वेगवेगळे मुद्दे पुढे आणले जात आहेत. शिक्षणासह विविध विषयांवर लोकांनी चर्चा करत राहावी आणि मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी सरकारच्या सहमतीने कळत-नकळत काही मुद्दे निर्माण केले जात आहेत, असे आम्हाला दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला. देशाच्या तिमाही जीडीपीच्या आकडेवारीबाबत बोलताना पवार म्हणाले की, अर्थमंत्री आणि पंतप्रधान अर्थव्यवस्थेचे अतिशय सुंदर चित्र असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अर्थव्यवस्थेतील मूळ प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नसल्याचे दिसते. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काही मुद्दे मांडले जात असून, देशातील वस्तुस्थिती बाजूला ठेवली जात आहे. आगामी काळात याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होईल. रुपयाचे मूल्य घसरल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशातून जाणाऱ्या पैशावर आणि महागाईवर होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

साखर आयात करण्याचा निर्णय अयोग्य

साखरेच्या वाढत्या दराचा ऊस उत्पादकांना अद्याप अपेक्षित फायदा झालेला दिसत नाही, असे पवार यांनी सांगितले. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारातील वाढत्या दरातील काही हिस्सा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तसे चित्र दिसत नाही. देशात साखर आयात करण्याचा निर्णयही योग्य नसल्याचे माझे मत आहे. आयात केलेली साखर कधी येणार आणि त्याचा नेमका फायदा काय होणार, हे आज सांगता येणार नाही, असे पवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT