उमेश काळे
टाकळी भीमा : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अशोक पवार यांचा पराभव करीत आपले अस्तित्व सिद्ध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ही निवडणूक शरद पवार गटाच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार असल्याने खासदार अमोल कोल्हेसह जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, माजी आमदार अशोक पवार यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे.(Latest Pune News)
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीसह शिरूर तालुक्यातील खरेदी-विक्री संघ निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने आणि कुठली शासकीय समिती कार्यकर्त्यांना सध्या नसल्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परंतु मागील निवडणुकीचा वचपा काढण्याची संधी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळणार असल्याने शरद पवार गटाने मागील महिन्यापासून बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे.
खासदार अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, माजी आमदार अशोक पवार, पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावपातळीवर संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाला गावपातळीवरील पक्ष शाखेला महत्त्वाचे स्थान असल्याने आता गाव पातळीवरील शाखा मजबूत करण्यावर शरद पवार गट गुंतला आहे. मतदार यादीत लागलेली बोगस नावे याचा पंचनामा करून चूक दुरुस्ती करण्यावर शरद पवार गटाने भर दिला आहे.
शिरूर-हवेली विधानसभेत 12 जिल्हा परिषद गट आणि 24 पंचायत समिती गणात दमदार उमेदवार देण्याची चाचपणी शरद पवार गटाकडून केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद, पंचायत समितीसह शिरूर नगरपालिकेतील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. जिल्हा
परिषद गटनिहाय दौरे करणार असल्याचे खा. अमोल कोल्हे यांनी सांगितले. त्यासाठी वेळदेखील काढून ठेवली आहे. या बैठकीला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीची ताकद जास्त असल्याचे दिसते, परंतु महायुती एकसंघ राहिली तर बरे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीची पक्षाच्या वतीने तयारी जोरदार सुरू केली आहे. महाविकास आघाडीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीकडून लढवण्याची तयारी केली जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार, महिला यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले जात असून मतदारयादीत बोगस नावे भरमसाठ वाढल्याने पक्षाच्या वतीने बीएलए नेमण्यात येत आहे. सामान्य मतदारांचा शरद पवार गटाच्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला चांगले यश मिळेल. येणाऱ्या निवडणुकीत पक्ष मोठ्या ताकतीने निवडणुका लढवणार आहे.देवदत्त निकम, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष