

बारामती : केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 साठी निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत सोयाबीन, मूग व उडीद खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.(Latest Pune News)
बारामती बाजार समितीने शेतकऱ्यांचा स्वच्छ व वाळलेला शेतमाल हमीभावाने खरेदीसाठी शासनाकडे केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. या खरेदी केंद्रावर नाफेडमार्फत सोयाबीनला 5328 रुपये, उडदासाठी 7800 रुपये तर मुगाला 8768 रुपये प्रतिक्विंटल या आधारभूत दराने शासनामार्फत खरेदी होणार असल्याची माहिती समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
शेतकऱ्यांनी यासाठी ऑनलाइन नोंदणी करावयाची असल्याने नोंदणीसाठी आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल नंबर, सन 2025-26 चा डिजिटल नोंद असलेला सात-बारा उतारा, पिकपेरा नोंद, बॅंकेचे पासबुक झेरॉक्स सादर करणे आवश्यक आहे. येथील बाबालाल काकडे निरा कॅनॉल सहकारी खरेदी-विक्री संघात ही नोंदणी प्रक्रिया होणार आहे.
दि. 15 नोव्हेंबरपासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील 90 दिवसांसाठी खरेदी करण्यात येणार आहे. बारामती मुख्य बाजार आवारातील यांत्रिक चाळणी येथे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग व उडीद या शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी दिलेल्या मुदतीत केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल खरेदी केंद्रावर आणताना निकषाप्रमाणे एफएक्यू दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवून आणावा, असे आवाहन समितीने केले आहे.