

कळस : मक्यासाठी शासनाने 2400 रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने मका खरेदी केली जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शासनाने मका खरेदी सुरू करण्याची मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.(Latest Pune News)
इंदापूर तालुक्यामध्ये 18 हजार 416 हेक्टरवर मका पिकाची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. मक्याला एकरी 20 ते 25 हजार खर्च येतो. उत्पादनाच्या तुलनेत मिळणारा भाव कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी मका खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव नाराजी व्यक्त केली.
हमीभावाने शेतमाल खरेदीबाबतच्या अधिनियमाबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. अतिवृष्टीने अगोदरच शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामध्ये मक्याचा दर पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे, तर पशुखाद्य कंपन्यांकडूनही आधारभूत किमतीपेक्षा मका खरेदी करीत आहेत. पशुखाद्य तयार करणाऱ्या कंपन्यांवरच सरकार मेहेरबान असल्याची टीका पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग रायते यांनी केली आहे.
आधारभूत किमतीचा कायदा कुठल्याही राज्यात पाळला जात नाही. जिल्हा बाजार समित्यांमध्ये मक्याला हमीभावापेक्षा कमी म्हणजे फक्त 1700 ते 1900 रुपयांचा दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे 400 ते 500 रुपये तोटा सहन करावा लागतो. त्या हमीभाव आणि खरेदी केलेला मका यांच्यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी; अन्यथा संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करणार. हमीभागावापेक्षा कमी दाराने मका विक्री झालेल्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
ॲड. पांडुरंग रायते, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटना