पुणे: आतापर्यंत मोबाईल आणि सोशल मीडियापुरते मर्यादित असलेले ज्येष्ठ नागरिकही आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) दुनियेत रमू लागले आहेत. एआयच्या दुनियेने आता ज्येष्ठांनाही आकर्षित केले असून, माहिती मिळवण्यापासून ते कार्यक्रमांचे पोस्टर तयार करणे, छायाचित्रांची निर्मिती आणि व्हिडीओ एडिटिंगपर्यंत विविध कामांसाठी ते एआयची मदत घेत आहेत. विशेष म्हणजे, या नव्या तंत्रज्ञानाविषयी त्यांच्यात केवळ कुतूहलच नाही, तर ते शिकून घेण्याची उत्सुकताही वाढत आहे. एआयच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची ज्येष्ठांची तयारी आता दिसू लागली आहे.
गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) साजऱ्या होणाऱ्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त केलेल्या दै. 'पुढारी'ने घेतलेल्या आढाव्यात ज्येष्ठांमध्ये एआयविषयी वाढती उत्सुकता आणि ज्येष्ठांकडून या तंत्रज्ञानाचा वापर अधोरेखित झाला. अनेक गोष्टी काही क्षणांत शक्य झाल्याने या तंत्रज्ञानाकडे तरुणांसह ज्येष्ठही आकर्षित होत आहेत. काही ज्येष्ठ नागरिक चॅटजीपीटी, गुगल जेमिनीसारख्या विविध माध्यमांतून एआयची ओळख करून घेत आहेत.
एखाद्या विषयाची सविस्तर माहिती मिळवणे, कार्यक्रमांसाठी पोस्टर बनविणे, आवडीच्या विषयांवरील छायाचित्रे तयार करणे, व्हिडीओमध्ये बदल करणे, लेख लिहिणे, अशा विविध कामांसाठी एआयची मदत घेतली जात आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सामाजिक संस्थांसह कुटुंबीयांकडूनही ज्येष्ठ या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेत आहेत. सध्या एआयचा वापर करणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिक राजा नेर्लेकर म्हणाले, एआयविषयी कुतूहल निर्माण झाल्याने मीही ते शिकण्याचा प्रयत्न करत आहे. एखाद्या विषयाची माहिती मिळवण्यासाठी चॅटजीपीटीची मदत घेतो. तसेच, विविध विषयांवरील छायाचित्रे तयार करणे आणि कार्यक्रमांसाठी पोस्टर बनवण्यासाठी एआय ॲप्सचा आधार घेतो. एआयचे जग भन्नाट असून, त्यातून अनेक नव्या गोष्टी शिकता येत आहेत. श्रीराम बेडकीहाळ म्हणाले, माझ्या नातवंडांकडून मी एआय कसे वापरायचे, याचे प्रशिक्षण घेत आहे. चॅटजीपीटीसारख्या माध्यमांचा वापर कसा करायचा, हे आता हळूहळू समजू लागले आहे. काळानुसार बदल स्वीकारून ज्येष्ठांनीही नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेतली पाहिजे.
ज्येष्ठांमध्ये एआयविषयी उत्सुकता वाढत आहे. सध्या आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातील काही सदस्य चॅटजीपीटीद्वारे विविध विषयांची माहिती मिळवत आहेत, तर काहीजण छायाचित्रे तयार करण्यासाठी एआयची मदत घेत आहेत. हे प्रमाण मर्यादित असले, तरी येत्या काळात त्यात वाढ होईल. ज्येष्ठांना एआयची प्राथमिक माहिती मिळावी, यासाठी नुकताच प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. लवकरच एआयबद्दल संपूर्ण माहिती देणाऱ्या कार्यशाळाही आयोजित करणार आहोत. ज्येष्ठांनी नवे तंत्रज्ञान वापरावेच. पण ते वापरताना काळजी घ्यावी.अण्णासाहेब टेकाळे, अध्यक्ष, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)