

पुणे: गणेशोत्सव होऊन पाच दिवस उलटले तरी रस्त्यावरील मांडव आणि मिरवणुकीचे रथ उभे असल्याबद्दल नागरिकांकडून टीका सुरू झाल्याने हे मांडव काढण्याची तयारी सुरू करण्यात आली. मात्र, अजूनही काही ठिकाणी मांडव आणि रथाचे गाडे जैसे थेच आहेत, अजून किती दिवस हे रथ इथेच राहणार आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार असा सवाल पुणेकर नागरिक करत आहेत.
गणेशोत्सवानंतर ४८ तासांत मांडव काढू, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र, पाच दिवस उलटले तरी मांडव आणि रथ अजूनही जैसे थेच उभे आहेत, हे नवरात्रीपर्यंत असेच राहणार का, असा सवाल पुणेकरांकडून केला जात आहे.
मध्यवस्तीतील काही मंडळांचे देखावे आणि मंडप अजूनही जैसे थेच आहेत. त्यामुळे पादचारी, वाहनचालकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. परिणामी, या भागातील वाहतूक संथ होत असून, पिक अवरला या भागात कोंडीजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी पादचारी, वाहनचालकांकडून केली जात आहे.
मध्यवस्तीतील अरुंद रस्त्यांवरील नारायण पेठ, मंडई, सदाशिव पेठ, शनिवार पेठ या भागांमध्ये दैनिक 'पुढारी'च्या वतीने बुधवारी (दि. ३०) पाहणी केली असता, ही परिस्थिती समोर आली. तसेच, अशी परिस्थिती उपनगरभागांमध्ये देखील निर्माण झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे.