कोरेगाव भीमा : कंपनीत सुरक्षा साधने न वापरल्याने सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेली समज आणि मॅनेजरकडे नेल्याच्या रागातून सुरक्षा अधिकाऱ्याला कामगाराने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात कामगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे ही घटना घडली.
विकास बाळासाहेब शिवले (रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंपनीचे सुरक्षा अधिकारी प्रवीण राजेंद्र प्रक्षाळे (रा. वाघोली, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात रविवारी (दि. 24) फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील एका कंपनीत कामगार असलेला विकास शिवले हा कंपनीत सुरक्षा साधने न वापरता काम करत होता. कंपनीचे सुरक्षा अधिकारी प्रक्षाळे यांनी त्याला अशा पद्धतीने कंपनीत येऊ नकोस, सुरक्षा साधने वापर असे म्हटले. त्याचा राग आल्याने शिवलेने प्रक्षाळेंना ’तू कोण अडवणारा, मी कोण आहे माहिती आहे का?’ असे उत्तर दिले. त्यामुळे प्रक्षाळेंनी विकासला कंपनीचे मॅनेजर सुमित गुहा यांच्याकडे नेले. त्या वेळी मॅनेजर यांनी शिवलेला समज दिली.
त्यानंतर सायंकाळी प्रक्षाळे हे कंपनीतून घरी जात असताना शिवलेने प्रक्षाळेंना अडवून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.
या वेळी काही महिला कामगारांनी प्रक्षाळेंना सोडवले. या वेळी शिवलेने त्या महिलांना देखील शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस हवालदार श्रावण गुपचे हे तपास करत आहेत.