पौड रोड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याची सहानुभूती मिळवत अनेक रिक्षा तसेच स्कूल व्हॅनचालक बेकायदा वाहतूक करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलण्याची गरज आहे. दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणार्या स्कूल बसमध्ये नियमानुसार सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही? याची तपासणी करण्याबाबत शाळा प्रशासन, पालक अनभिज्ञ असल्याचे दिसले.
रिक्षा व स्कूल व्हॅनमध्ये गरजेपेक्षा जास्त विद्यार्थी असतात. प्रत्येक वाहनचालकाकडे शालेय वाहतूक परवाना असणे जरुरीचे आहे. शाळेच्या व्हॅनमध्ये 12 पेक्षा जास्त विद्यार्थी असू नयेत, असा नियम आहे. तरी 12 पेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. पौड रोड परिसरात नामांकित शाळा आहेत. त्यामुळे दररोज स्कूल बस दिसतात. या बसमध्ये एक महिला मदतनीस असावी, असा नियम आहे. मात्र, अजूनही या नियमाचे पालन केल्याचे दिसून येत नाही. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या स्कूल व्हॅनचालकांना शाळाचालक पार्किंगचे अधिकृत पत्र देत नसल्यामुळे या वाहनांत मदतनीस असावी, असा नियम आहे. मात्र, अजूनही या नियमाचे पालन केल्याचे दिसून येत नाही.
असे आहेत नियम
- वाहनाला शालेय विद्यार्थी वाहतूक परवाना आवश्यक
- वाहनाचा रंग पिवळा असावा
- शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनात महिला सहायक बंधनकारक
- अंतर्गत आसनव्यवस्था चांगली असावी, त्याचबरोबर आसनाच्या बाजूला हँडल असावीत
- वाहनात अग्रिशामक उपकरण आवश्यक
- खिडकीच्या बाहेरील बाजूस आडवे लोखंडी बार आवश्यक
- आपत्कालीन दरवाजा हवा
- गाडीमध्ये बॅग ठेवण्यासाठी जागा असावी
- प्रथमोपचार पेटी अनिवार्य
- गाडीची फिटनेस तपासणी वेळेवर केलेली असावी
- वाहनाचा विमा असायला हवा
- आसनक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरू नयेत
- खासगी वाहनांमधून शालेय वाहतूक करू नये
जबाबदारी सर्वांचीच…
विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेची जबाबदारी ही शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, पोलिस यांच्यासह पालकांचीही आहे. विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करतात. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन यासंदर्भात सकारात्मक विचार केला पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी व्हॅनचालक व रिक्षाचालकांची असते. त्यांना वेळेवर आणणे व नेण्याची जबाबदारीसुद्धा त्यांचीच असते. तसेच त्यांची कागदपत्रे व परवाना बघूनच त्यांना परवानगी दिली जाते. पालकांनी आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी वाहनांमधील मुलांच्या संख्येवर लक्ष ठेवावे.
– विद्या जाधव, मुख्याध्यापिका, विजयमाला कदम कन्या प्रशाला
याबाबतीत शिक्षण विभाग, पोलिस आयुक्त, परिवहन विभागाला अनेकवेळा पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, यावर ठोस उपाययोजना केली जात नाही, शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेला नोटीस देणे अपेक्षित आहे. जेणेकरून या स्कूल बसचालक व मालकांना आळा बसेल.
– प्रवीण कदम, कार्यकारी सदस्य, विद्यार्थी सुरक्षा विभाग, मनसे
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.