Recruitment Pudhari
पुणे

Pune University Recruitment: पुणे विद्यापीठात 111 प्राध्यापकांची भरती; दर्जा सुधारण्याचा प्रयत्न

एनआयआरएफ रँकिंग घसरल्याने प्रशासनाकडून मोठे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दर्जा घसरत असल्याचे गेल्या काही वर्षांतील एनआयआरएफ रँकिंगवरून स्पष्ट झाले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलण्यास सुरू केली आहे. येत्या जुलै महिनाअखेर प्राध्यापकांसह अधिष्ठाता तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांची भरती करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी स्पष्ट केले.

अधिसभेसमोर विद्यापीठाचा कार्यअहवाल सादर करताना विद्यापीठात राबविण्यात येणारे नवीन अभ्यासक्रम तसेच विद्यापीठाने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. त्याचबरोबर विद्यापीठात आवश्यक असणाऱ्या कर्मचारीभरतीसंदर्भात देखील माहिती दिली. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, विद्यापीठात 111 प्राध्यापकांची भरती करण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला आहे.

त्यानुसार गुणवत्तेनुसारच प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, जुलैअखेरपर्यंत प्राध्यापकभरती पूर्ण करण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार साठ-चाळीस गुणांच्या सूत्रानुसार संबंधित भरती केली जाणार असून, कोणत्याही वशिलेबाजीशिवाय पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. त्या 7 एप्रिलला परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडेल आणि विद्यापीठाला पुढील काळासाठी प्रभारी संचालकांची आवश्यकता राहणार नाही. तसेच, सध्या जरी प्रभारी अधिष्ठाता असले तरी 27 ते 30 एप्रीलदरम्यान अधिष्ठातानिवडीसाठी मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे. यातून विद्यापीठाला एप्रिलअखेर परीक्षा विभागाचे संचालक आणि अधिष्ठाता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कडेकोट बंदोबस्तात अधिसभा

गेल्या काही अधिसभांमध्ये विद्यार्थी तसेच कर्मचारी संघटनांकडून अधिसभेत गोंधळ घालून नारेबाजी करण्यात आल्याचे प्रकार घडले. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मुख्य इमारतीच्या मेन गेटसमोरच बॅरिकेडिंग करण्यात आले होते. तसेच, मुख्य इमारतीला सुरक्षारक्षकांचा कडा पहारा असल्याचे दिसून आले. त्यामुळे अधिसभा सदस्य आणि विद्यापीठाचे अधिसभेशी संबंधित कर्मचारी वगळता अन्य कोणीही फिरकू शकणार नाही, याची खबरदारी विद्यापीठ प्रशासनाने घेतल्याचे दिसून आले.

आज मांडणार अर्थसंकल्प

विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा असली तरी पहिल्या दिवशी डॉ. आदित्य अभ्यंकर यांचे निलंबन, विद्यापीठाचे फॉरेन्सिक ऑडिट, अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांमधील मतभेद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि स्थगन प्रस्तावावरील चर्चा यातच दिवस संपल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाचा अर्थसंकल्प आज शनिवारी दि. 28 रोजी मांडण्यात येणार असून, त्यावर कट मोशन घेऊन तो मंजूर केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT