गणेश खळदकर
पुणे: शिपाई पदापासून वित्त व लेखा विभागातील महत्त्वाच्या पदाला गवसणी घातली. हा चांगला पैलू असतानाच दारूचे व्यसन जडले आणि कर्जाचा बोजा वाढला. मग, पैसा कमविण्यासाठी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेलाच हात घातला आणि त्यातून आता तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. ही एखाद्या पटकथेला साजेशी वाटणारी चित्तरकथा आहे बनावट पदवीचे सूत्रधार रमेश मुखेकर याची.
विद्यापीठात मुखेकरच्या सहवासात काही काळ घालवलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश मुखेकर हे विद्यापीठात अनुकंपा तत्त्वावर कामाला लागल्यावर त्यांना शिपाई पदावर कामाची संधी देण्यात आली. परंतु, त्यानंतर दोन पदोन्नती मिळवत त्यांनी वित्त व लेखा विभागात महत्त्वाच्या पदावर काम करण्यास सुरुवात केली. एखाद्या शिपायाने या पदावर जाणे ही साधी गोष्ट नाही. परंतु ही जमेची बाजू सोडली, तर मुखेकरला दारूचे व्यसन होते. त्यातूनच त्याने विद्यापीठातील लोकांशी गोड बोलून त्यांना अडचणींचे कारण सांगून उसने पैसे घेत अनेकांना टोपी घालत अनेकांचे पैसे देखील बुडवले आहे. तसेच त्याच्यावर लाखो रुपयांचे कर्ज आहे.
मुखेकरने केवळ विद्यापीठात काम करत असल्याचा फायदा घेत परस्पर केलेला हा उद्योग आहे. फोटो एडीटींगच्या माध्यमातून त्याने विविध पदव्या संबंधित व्यक्तीला पाठवल्या. यापलीकडे मूळ दस्तऐवजात मुखेकरला कोणताही फेरफार करता आला नाही. परिणामी, त्यांना बनावट डिग्री देणे शक्य झाले नाही.
त्यामुळे यामध्ये विद्यापीठातील अन्य कोणाचाही सहभाग असण्याची शक्यता कमी आहे. जरी असला तरी आता ते पोलिस तपासात उघडकीस येईल. विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यापूर्वी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येते. या समितीमार्फत
संबंधित कर्मचाऱ्याची विभागीय
चौकशी करण्यात येईल. यामध्ये त्या कर्मचाऱ्याला देखील आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल आणि यामध्ये दोषी आढळल्यानंतर विद्यापीठाला संबंधित कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार असल्याचे देखील संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पोलिस चौकशी आणि न्यायालयीन खटला याव्यतिरिक्त विद्यापीठामार्फत संबंधित कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी देखील करण्यात येईल. सध्या विद्यापीठ प्रशासनाने त्या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. परंतु तो कर्मचारी विद्यापीठ सेवेत आहे. परंतु विभागीय चौकशीत जर तो कर्मचारी दोषी आढळला, तर त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात येणार आहे.डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ