

पुणे: गांजातस्करांशी संगनमत ठेवून त्यांच्याकडून आर्थिक लाभ घेतल्याचा ठपका सिद्ध झाल्याने स्वारगेट पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई नवनाथ कांताराम शिंदे याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. विभागीय चौकशी, साक्षीपुरावे आणि मोबाईल संपर्काच्या आधारे आरोप पूर्णपणे सिद्ध झाल्याचा निष्कर्ष नोंदवत अपर पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे यांनी हे आदेश दिले आहेत.
स्वारगेट पोलिस ठाण्यात कार्यरत असताना शिंदेने सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांजा विक्रेत्यांशी सातत्याने संपर्क ठेवला, त्यांना अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी अप्रत्यक्ष मदत केली आणि त्यातून आर्थिक लाभ मिळविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी प्राथमिक चौकशी, त्यानंतर विभागीय चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान सरकारी साक्षीदारांचे जबाब, मोबाईल संपर्काचे तांत्रिक पुरावे आणि इतर कागदपत्रांवरून सर्व आरोप सिद्ध झाल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी नमूद केले. चौकशीत गांजातस्कराच्या मोबाईलमध्ये शिंदेचा क्रमांक व मागील दोन वर्षांपासून दोघांमध्ये सातत्याने संपर्क असल्याचे तसेच तस्करांकडून नियमित आर्थिक व्यवहार होत असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही त्यांची पायमल्ली करून शिंदे यांनी उलट तस्करांनाच संरक्षण दिल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे.
विभागीय चौकशीतही बडतर्फची शिफारस
विभागीय चौकशी अधिकाऱ्यांनी शिंदे यांचे वर्तन संशयास्पद, बेशिस्त, बेजबाबदार आणि पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचा निष्कर्ष नोंदविला. त्यानंतर परिमंडल-२ च्या पोलिस उपायुक्तांनीही सर्व आरोप गंभीर असल्याचे नमूद करीत सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस केली होती. दरम्यान, कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर शिंदे यांनी खुलासा सादर केला तसेच प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान आपली बाजूही मांडली. मात्र, त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याचे नमूद करीत अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी विभागीय चौकशीतील निष्कर्ष आणि पोलिस उपायुक्तांच्या शिफारशींशी सहमती दर्शविली.
चौकशीत काय उघड झाले..?
गांजातस्करांशी दोन वर्षे सातत्याने संपर्क.
तस्कराच्या मोबाईलमध्ये शिपायाचा क्रमांक जतन.
अवैध धंद्यास अप्रत्यक्ष संरक्षण दिल्याचा ठपका.
तस्करांकडून नियमित आर्थिक लाभ घेतल्याचा निष्कर्ष.