

पुणे: पुणे पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात उघडलेल्या आक्रमक मोहिमेत चालू वर्षात १६२ गुन्हे दाखल करून २८३ आरोपींना गजाआड करण्यात आले असून, तब्बल ११ कोटी २८ लाख रुपयांचे अमली पदार्थ आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आंतरराज्यीय तस्करांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) आणि एनडीपीएससारख्या कठोर कायद्यांचा बडगा उगारला आहे. व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांना उपचार व पुनर्वसनाची संधी असा उपक्रम पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.
तस्करांवर केवळ कारवाई न करता पुरवठा साखळी खंडित करणे, व्यसनाधीनांना उपचारासाठी प्रवृत्त करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे, अशी त्रिसूत्री पुणे पोलिसांनी स्वीकारली आहे. या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कारवाई करण्यावरही भर देण्यात येत आहे.
या मोहिमेतील व्यसनाधीन व्यक्तींना गुन्हेगार म्हणून न पाहता त्यांना उपचाराची संधी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जुलै महिन्यात अमली पदार्थांच्या सेवनाप्रकरणी १३८ गुन्हे दाखल केले आहेत. शाळा-महाविद्यालयांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांमधील व्यसनाची प्रारंभिक लक्षणे ओळखणे, पालक आणि शिक्षकांची भूमिका, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
... कारवाईबरोबरच जनजागृती
शाळा, महाविद्यालये आणि 'कॅम्पस कनेक्ट' उपक्रमांतर्गत यंदा १०४ जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी 'ड्रग्जला नकार' देण्याबरोबरच संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन या कार्यक्रमांतून करण्यात आले. कारवाई, जनजागृती, पुनर्वसन आणि शैक्षणिक संस्थांचा सहभाग या चार सूत्रांच्या बळावर पुणे शहर अमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पहिलाच उपक्रम
नांदेड सिटी पोलिस ठाण्यातील अमली पदार्थ प्रकरणातील आरोपीने व्यसनमुक्तीची तयारी दर्शविल्यानंतर न्यायालयाने कायद्यातील कलम ६४(अ) अंतर्गत त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचे आदेश दिले. उपचाराचा नियमित प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुणे शहरातील हा पहिलाच असा उपक्रम ठरला आहे.
अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पुणे पोलिसांची 'झीरो टॉलरन्स' भूमिका कायम राहणार आहे. ड्रग्ज माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील. मात्र, व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांकडे केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता त्यांना व्यसनमुक्ती, समुपदेशन आणि पुनर्वसनाची संधी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर.