SPPU Pudhari
पुणे

Pune University Exam Centre Audit: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण; मान्यता देण्यापूर्वी महाविद्यालयांची पाहणी

१६ ते २२ सप्टेंबरदरम्यान अर्जांची पडताळणी; २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन तपासणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील आगामी परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडाव्यात, यासाठी विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी दिली आहे.

डॉ. तलवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७च्या प्रथम सत्रातील परीक्षांपूर्वी हे लेखापरीक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि संचालकांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या ऑनलाइन प्रणालीवर अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

प्राप्त अर्जाची पडताळणी दि. १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान करण्यात येत आहे. यानंतर दि. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत विद्यापीठाची विशेष समिती संबंधित परीक्षा केंद्रांची प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पाहणी करणार आहे. परीक्षा केंद्रासाठी निश्चित केलेल्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या महाविद्यालयांना १२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या प्रक्रियेत 'ऑक्टोबर-नोव्हेंबर' परीक्षांपूर्वी अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.

तसेच, लेखापरीक्षणात त्रुटी आढळल्यामुळे एखाद्या महाविद्यालयाला परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली नाही, तर त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था जवळच्या मान्यताप्राप्त परीक्षा केंद्रावर करण्यात येईल. अशा परिस्थितीत संबंधित महाविद्यालयाने त्या परीक्षा केंद्राला आवश्यक मनुष्यबळ आणि संसाधने उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

चार भागांतील संस्थांना नियम लागू

परीक्षा केंद्रांच्या लेखापरीक्षणाचा हा नियम पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यासह दादरा व नगर हवेली येथील पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांना लागू राहणार आहे. या प्रक्रियेमुळे परीक्षा केंद्रांमधील उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ आणि परीक्षा संचालनाची तयारी यांची तपासणी होऊन परीक्षा अधिक शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT