

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अप) कडून इच्छुक असलेल्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे गर्दी केली आहे. पवार यांनी शनिवारी (१९) बारामती येथील सहयोग निवासस्थानी इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी निश्चित करण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील परिस्थिती, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि सभासदांशी असलेला संपर्क यांचा आढावा घेतला जात आहे. सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठींमधून इच्छुकांच्या भूमिका आणि स्थानिक परिस्थिती जाणून घेण्यावर भर देण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) गटाकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली असून, इच्छुकांच्या मुलाखतीनंतर गावभेटी, सभासदांशी चर्चा आणि स्थानिक पातळीवर संपर्क सुरू केला आहे.
भाजपकडूनही इच्छुकांच्या मुलाखतींचे सत्र सुरू झाले आहे. शनिवारी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबरोबरच भाजपनेही कारखाना निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार विजय शिवतारे यांनीही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट, दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार पक्षाचे शेतकरी पॅनेल, तसेच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून सुरू असलेली स्वतंत्र तयारी यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीत चार राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर इच्छुकांची मोठी संख्या समोर आली आहे. आता अर्ज माघारीची मुदत जवळ येत असताना कोणत्या गटातून कोण मैदानात राहणार, कोणत्या इच्छुकांची पॅनेलमध्ये वर्णी लागणार आणि स्थानिक पातळीवर कोणती राजकीय जुळवाजुळव होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.