पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना विद्यापीठाचा कारभार सुधारण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. परंतु, गेल्या तीन वर्षांत झाले नाही ते तीन महिन्यांत कसे होणार? असा प्रश्न माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांना विचारला असून, विद्यापीठाच्या कुलगुरूंना कार्यपद्धती बदलण्याचा सल्ला दिला आहे.
कुलकर्णी म्हणाले, की चंद्रकांत पाटील यांनी काही विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिसभा सदस्य यांची बैठक बोलावली. त्या बैठकीत विद्यापीठ कारभाराविषयी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली. परिणामी, कारभार सुधारण्यासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना तीन महिन्यांची मुदत दिली. जर कारभारात योग्य सुधारणा झाल्या नाहीत, तर कडक कारवाई करण्याचे संकेत बैठकीतील चर्चेदरम्यान दिले.
परंतु तीन महिन्यांत नियमित कुलसचिव निवड प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे तीन महिन्यांत विद्यापीठास नियमित कुलसचिव मिळणार नाही. कॅग अहवालातील फक्त एकाच विभागाच्या आक्षेपावर अधिसभेत चर्चा झाली. परंतु 35 आक्षेप नोंदविलेले आहेत, त्याचे काय, फॉरेन्सिक ऑडिट तीन महिन्यांत होणार नाही. रूसाकडून संशोधन व विविध शैक्षणिक प्रकल्पांसाठी मिळालेले अर्थसाहाय्य रक्कम उपयोगात न आणल्यामुळे परत करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली.
विद्यापीठ परिसरातील विविध विभागांत रिक्त असणाऱ्या 111 प्राध्यापक पदावरील भरती प्रक्रिया पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. विद्यापीठात 4 अधिष्ठाता पदावर नियुक्ती प्रक्रिया गेली 3 वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्या साठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना गरजेच्या आहेत. त्यासाठी विद्यमान नेतृत्वाने आपली कार्यपद्धती बदलावी अथवा येथे नवीन नेतृत्व नियुक्त करावे, असा सल्ला देखील कुलकर्णी यांनी दिला आहे.
पुढील तीन महिन्यांत हे देखील शक्य नाही
नॅक मूल्यांकन पूर्ण होण्याची शक्यता नाही.
विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर कमी झालेले गुणांकन दर्जा वाढणार नाही.
कुलगुरूंचे काही निवडक विद्यार्थी संघटनांबरोबर असलेले विशेष संबंध बदलणार नाहीत. कुलगुरू कुठल्याच निर्णयावर ठाम राहत नाहीत
विद्यापीठात पूर्ण क्षमतेने विद्यार्थी प्रवेश घेतील यासाठी कोणतीही योजना नाही. संशोधन केंद्रे कृतिशील होण्याची शक्यता नाही.
विद्यापीठाच्या कृती शून्यतेमध्ये कोणताही बदल होणार नाही.