SPPU Pudhari
पुणे

Pune University New Colleges: पुणे विद्यापीठाच्या हद्दीत १३ नवीन महाविद्यालयांना सशर्त मंजुरी; परिसरातील कॉलेजांची होणार तपासणी

अधिसभेचा निर्णय; पत्त्यातील त्रुटी, महाविद्यालयांची संख्या आणि पारंपरिक अभ्यासक्रमांतील घटत्या प्रवेशाचा घेतला जाणार आढावा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात १३ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी अधिसभेने शुक्रवारी सशर्त मान्यता दिली. शिक्षण संस्था कुठे महाविद्यालय सुरू करणार, आजूबाजूला किती महाविद्यालये आहेत, याबाबत तपासणी करूनच पुढील कार्यवाही करण्याचा ठराव करण्यात आला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अधिसभा झाली. प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार या वेळी उपस्थित होते. २०२७-२८च्या वार्षिक आराखड्यासंदर्भात नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी सार्वजनिक विद्यापीठांच्या प्राधिकरणाची मान्यता घेऊन शासनाला सादर करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १४ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती.

त्यानुसार मान्यता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने तातडीची अधिसभा आयोजित केली होती. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यांत १३ नवीन महाविद्यालये सुरू करण्याच्या शिफारसी अधिसभेत मांडण्यात आल्या. अधिसभा सदस्यांनी महाविद्यालय सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांतील पत्त्यांतील त्रुटी, ज्या ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

त्यांच्या आजूबाजूला असलेली महाविद्यालये, पारंपरिक कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवी अभ्यासक्रमांना कमी होत असलेले प्रवेश याकडे लक्ष वेधून प्रस्तावांची सखोल तपासणी करण्याची आग्रही भूमिका मांडली. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने तपासणी करूनच शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महाविद्यालयांच्या मान्यता प्रस्तावाला अधिसभेची मंजुरी देण्यात आली.

विशेष अधिसभेच्या वैधतेवरच सदस्यांकडून प्रश्नचिन्ह

अधिसभा सदस्यांनी विशेष अधिसभेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अचानकपणे अधिसभा बोलावताना अधिसभा सदस्यांना गृहित धरण्यात आले, कोणत्या आधारावर तातडीने अधिसभा घेण्यात आली, असे प्रश्न उपस्थित केले. कुलपतींच्या परवानगीनेच अधिसभा आयोजित करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, त्यानंतरही काही काळ वादविवाद, मानापमानाचे नाट्य सुरू राहिले. अखेरीस कार्यक्रमपत्रिकेनुसार कामकाज पूर्ण करून अधिसभा संपवण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT