सासवड: पुरंदर तालुक्यातील सासवड शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात सुमारे 700 हून अधिक भटकी कुत्री असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मार्केट यार्ड, भाजी मंडई, सोनोरी रस्ता, पालखी तळ परिसर आणि मुख्य चौकांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री व पहाटेच्या वेळी दुचाकीस्वार आणि शाळकरी मुलांच्या मागे कुत्री लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, ज्येष्ठ नागरिकांनाही सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडताना भीती वाटत आहे.
ग््राामीण रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार दरमहा 100हून अधिक नागरिक श्वानदंशाच्या उपचारासाठी दाखल होत आहेत. ग््राामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार यांनी सांगितले की, आवश्यक लसींचा साठा उपलब्ध असला तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोकाट श्वानांवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.
उघड्यावर टाकला जाणारा कचरा तसेच हॉटेल आणि ढाब्यांमधील शिल्लक अन्नामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवे घाट परिसरातील उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या अन्नामुळे कुत्र्यांचा वावर वाढल्याचेही निदर्शनास येत आहे.
आतापर्यंत 156 कुत्र्यांची नसबंदी
दरम्यान, सासवड नगरपरिषदेकडून विशेष एजन्सीमार्फत भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 156 कुत्र्यांवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली असून, पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्याचे कामही सुरू आहे. प्राणीप्रेमी आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी केवळ कुत्री पकडून प्रश्न सुटणार नसून शास्त्रोक्त नसबंदी आणि कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली आहे. नागरिकांनीही उघड्यावर कचरा आणि उरलेले अन्न टाकणे टाळावे, तसेच पाळीव कुत्री मोकळी न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.