अमृत भांडवलकर
सासवड : सासवड नगरपरिषद निवडणूक चुरशीची ठरली आहे. मतदारांचा कल कोण्या एका बाजुला असल्याचे दिसून आले नाही. 20 जागांसाठी भाजप, शिवसेना आणि अपक्षांसह 47 उमेदवार रिंगणात असून, यंदा मतदानाचा टक्का घटल्याने माजी आमदार संजय जगताप आणि आमदार विजय शिवतारे यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे सासवडचा किल्लेदार कोण ठरणार? याबाबतची उत्सुकता 21 डिसेंबरला संपणार आहे.
मतदानाआधी घडलेल्या नाट्यमय घटनांमुळे महायुतीतच मुख्य लढत झाली. राज्यात एकत्र असलेल्या महायुतीचे सासवडमध्ये मात्र, संघर्षाचे चित्र दिसले. अजित पवार गटाचे ‘घड्याळ’ चिन्ह निवडणुकीतून गायब झाले, तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार माजी उपनगराध्यक्ष वामन जगताप यांनी माघार घेतली. याशिवाय सासवड शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कुटुंबाचा अचानक भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने मोठे राजकीय नाट्य निर्माण झाले. या घडामोडींचा लाभ भाजपला होणार की नाही, हे निकालानंतर ठरणार आहे.
महाविकास आघाडीकडून बैठक घेऊन 22 जागा आणि नगराध्यक्षपद लढवण्याचा निर्णय झाला होता. नगराध्यक्षपदासाठी अभिजित मधुकर जगताप (शिवसेना ठाकरे) यांचे नाव जाहीर करण्यात आले. मात्र राष्ट्रवादी (शरद पवार) गट आणि काँग्रेसने सक्रिय भूमिका घेतली नाही. सासवड शहरातील काँग्रेस भाजपची ‘ब टीम’ झाल्याची चर्चा निवडणुकीदरम्यान जोरात होती. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. निकालाची आतुरता असतानाच मतमोजणी अचानक पुढे ढकलल्याने संभाव्य विजेत्यांचा आनंद 20 दिवसांसाठी थांबाव लागणार आहे. परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सासवडमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली यंदा भाजप कमळ फुलवणार का? याची उत्सुकता आहे.
1998 ते 2023 या काळात शहर जनमत विकास आघाडीचे वर्चस्व सासवड मध्ये राहिले. चंदुकाका जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांचा प्रभाव स्पष्ट दिसला. 2024 च्या विधानसभा पराभवानंतर संजय जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही निवडणूक थेट भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे) अशी लढत झाली. मागील दोन निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली होती; तर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन-दोन जागा मिळाल्या होत्या. नगराध्यक्षपद केवळ 75 मतांनी हुकले होते. यंदा नगराध्यक्षपदासाठी आनंदीकाकी चंदुकाका जगताप (भाजप) आणि सचिन सुरेश भोंगळे (शिवसेना शिंदे) यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळाली.
33,656 मतदारांपैकी 22,557 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 11,412 पुरुष आणि 11,145 महिला मतदारांचा समावेश आहे. यंदा मतदानाचा टक्का घसरून 67.02 टक्क्यांवर आला.
शहरात नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक, 18 वर्षांचे तरुण-तरुणी, विद्यार्थी, परप्रांतीय कामगार आणि वाढत्या कुटुंबांमुळे हललेले मतदार या नवमतदारांनी कोणाला कौल दिला याबाबत उत्सुकता आहे. या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक इच्छुकांनी स्वतंत्र संपर्क मोहीम राबविली होती.