Saswad Khanwadi Road Condition Pudhari
पुणे

Saswad Khanwadi Road Condition: सासवड-खानवडी रस्ता खड्डेमय; पंचायत समिती सभेत प्रशासनावर जोरदार टीका

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी; बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत कुंभारवळण-एखतपूर-मुंजवडीमार्गे खानवडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रश्नावरून सदस्यांनी बांधकाम विभागाला धारेवर धरत प्रशासनातील समन्वयाच्या अभावावर तीव नाराजी व्यक्त केली आहे.

सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, सदस्य माणिक निंबाळकर, माऊली यादव, अर्चना कटके, सायली शिंदे, मोनिका कांबळे, स्मिता निगडे तसेच गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ आणि विविध विभागांचे अधिकारी सभेस उपस्थित होते.

या वेळी सदस्य माणिक निंबाळकर यांनी, 11 एप्रिल रोजी खानवडी येथे क्रांतिज्योती इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर येणार आहेत. अशा वेळी संबंधित रस्ता पूर्णपणे खड्ड्‌‍यांनी जर्जर झाला आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्याच रस्त्याचा वापर करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‌‘मुख्यमंत्री येणार असताना हा खड्डेमय रस्ता दाखवणार आहात का?‌’ असा थेट सवाल करीत निंबाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्यातील ढकलाढकलीवर तीव टीका केली. 2022 पर्यंत हा रस्ता जिल्हा मार्ग म्हणून अस्तित्वात होता; मात्र त्यानंतर तो प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. तरीही तांत्रिक कारणे पुढे करीत दुरुस्ती टाळली जात असल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला.

यावर बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय गिते यांनी संबंधित रस्ता पूर्णतः बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट केले. निंबाळकर यांनी दोन्ही विभागांचे अधिकारी आणि मुख्यमंत्री ग््राामसडक योजनेतील संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.

तहसीलदार विक्रम राजपूत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही माहिती मागविण्यात आल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी ते खानवडी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

आमदार विजय शिवतारेंकडून दखल

दरम्यान, आमदार विजय शिवतारे यांनीही या गंभीर प्रश्नाची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तसेच लेखी पत्राद्वारे तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT