

पुणे: रेल्वे पुणे विभाग प्रशासनाकडून म्हातोबाची आळंदी (ता. हवेली) येथे नवीन कोचिंग डेपो उभारण्याचे नियोजन आहे. रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर या हालचालींना वेग आला असून, रेल्वे अधिकाऱ्यांकडून याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर रेल्वे गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने होऊ शकणार आहे.
पुणे रेल्वेस्थानक सध्या क्षमतेपेक्षा जास्त गाड्या हाताळत आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीकरिता कोचिंग डेपो असणे, हे गरजेचे बनले आहे. त्यामुळे मिरज लाइनच्या दिशेला असलेल्या म्हातोबाची आळंदी येथे हा कोचिंग डेपो उभारण्याबाबत रेल्वेच्या पुणे विभाग प्रशासनाकडून विचार सुरू आहे. हा डेपो झाल्यास पुणे विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या डेपोमध्ये आधुनिक पिट लाइन्स आणि स्वयंचलित वॉशिंग यंत्रणा असेल. त्यामुळे गाड्यांची स्वच्छता आणि तांत्रिक तपासणी अत्याधुनिक दर्जाची होणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे फक्त प्रवाशांची सोय होणार नाही, तर स्थानिक स्तरावर उद्योग आणि रोजगारांनाही चालना मिळणार आहे. आगामी काळात येथे पाहणी झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यासंदर्भात कार्यवाही होण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
कोचिंग डेपोत कोणत्या सुविधा असतात?
रेल्वे गाड्यांच्या डब्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासह रेल्वेची स्वच्छता आणि पार्किंगसाठी असलेला मोठा यार्ड/वर्कशॉप म्हणजे कोचिंग डेपो. आतापर्यंत पुण्यामध्ये प्रवासी गाड्या सेवा सुरू करण्यापूर्वी असा कोचिंग डेपो तयार असणे गरजेचे असते. या डेपोमध्ये रेल्वेची चाके, बेक तपासणी करण्यासाठी खोलवर बांधलेल्या ट्रॅकचा समावेश असलेले पिट लाइन्स असतात. डब्यांच्या आंतर्बाह्य स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रणेचा स्वयंचलित वॉशिंग प्लांट असतो. सर्व डब्यांमध्ये मुबल पाणी भरण्याची हायस्पीड यंत्रणा असते. शिवाय डब्यातील पंखे, दिवे, एसी दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिक मेंटनन्स सुविधा असते. गाड्यांसाठी लागणारे सुटे भाग आणि तांत्रिक साहित्याचा साठा करता येऊ शकेल असा स्टोअर डेपो असतो.
प्रकल्पामुळे काय फायदा होणार?
पुण्यातून नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यासाठी आता जागेची आणि देखभालीची अडचण येणार नाही.
गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम वेगाने होऊ शकतील
स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील.
सध्या पुणे स्टेशनवर असलेला देखभालीचा ताण आळंदीकडे वळवल्यामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होईल.
आधुनिक डेपोमुळे रेल्वे डब्यांची स्वच्छता आणि तांत्रिक सुरक्षितता अधिक दर्जेदार होईल.