Sassoon Hospital Pudhari
पुणे

Pune Neonatal Diabetes Genetic Discovery: ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा जागतिक वैद्यकीय शोध; नवजात मधुमेहाशी संबंधित नवे जनुकीय उत्परिवर्तन उघड

‘ट्रान्झियंट निओनेटल डायबेटिस’वरील जगातील पहिला जनुकीय दुवा; पुण्याचे नाव जागतिक वैद्यकीय नकाशावर ठळक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आहे. ‌‘ट्रान्झियंट निओनेटल डायबेटिस मेलिटस‌’ या दुर्मीळ आजाराशी संबंधित नवीन जनुकीय उत्परिवर्तनाचा जगातील पहिला दुवा ससूनमधील डॉक्टरांनी शोधून काढला आहे. या संशोधनामुळे पुण्याचे नाव जागतिक वैद्यकीय नकाशावर अधोरेखित झाले आहे.

ससूनमधील हा अभ्यास 27 आठवड्यांत जन्मलेल्या अवघ्या 720 ग््रॉम वजनाच्या बालकावर आधारित आहे. जन्मानंतर बाळाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने वाढलेले आढळले. तपासणीनंतर त्याला ‌‘निओनेटल डायबेटिस‌’ असल्याचे निदान झाले. सुरुवातीला इन्सुलिन देणे आवश्यक ठरले. मात्र, काही कालावधीनंतर मधुमेह आपोआप आटोक्यात आला. त्यामुळे हा प्रकार ट्रान्झियंट (तात्पुरता) निओनेटल डायबेटिस असल्याची खात्री झाली.

प्रगत जनुकीय तपासणीत ‌‘एमएस4ए6ए‌’ या जनुकामध्ये यापूर्वी कधीही नोंद न झालेले ‌’होमोझायगस‌’चे उत्परिवर्तन आढळून आले. या जनुकाचा निओनेटल डायबेटीसशी असलेला संबंध आजपर्यंत जगात कुठेही नोंदवलेला नव्हता. सखोल अभ्यासातून या शोधाला वैज्ञानिक पुष्टी मिळाली आहे. ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रगती कामत, निओनॅटॉलॉजी टीममधील डॉ. संदीप कदम आणि डॉ. सोहराब शकील यांचे अभिनंदन केले.

संशोधनातील अग््रागण्य केंद्र

हे संशोधन आंतरराष्ट्रीय, समकक्ष पुनरावलोकित जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून, यामुळे अशा रुग्णांमध्ये अनावश्यक कायमस्वरूपी इन्सुलिन उपचार टाळण्यास मदत होणार आहे. तसेच ससून रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग आणि क्लिनिकल जेनेटिक्स सेंटर ऑफ एक्सलन्स हे नवजात संशोधनातील अग््रागण्य केंद्र असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

संशोधनात योगदान देणारे लेखक

सोहराब शकील, संदीप कदम, समीर पवार, ध्येय पंड्या, प्रगती कामत, राहुल दवरे, कांचन साखरकर, अभिनव कचरे, संगीता चिवले, सुविधा सरदार, अभिलाष यमावरम, पूनम माने, प्रकाश गंभीर, पराग एम. ताम्हणकर, सलील वनियावाला आणि आरती ए. किणीकर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT