

पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, बारावीची परीक्षा 10 फेबुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 20 फेबुवारीपासून सुरू होणार आहे. यंदा बारावीच्या परीक्षेला सुमारे 15 लाख 32 हजार, तर दहावीच्या परीक्षेला 16 लाख 14 हजार विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षेदरम्यान एखाद्या केंद्रावर विद्यार्थी कॉपी करताना किंवा गैरप्रकार करताना आढळल्यास, त्या केंद्राची थेट मान्यता रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य मंडळात झालेल्या पत्रकार परिषदेत कुलकर्णी बोलत होते. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते. या परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि पूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य मंडळाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा राज्यातील 3 हजार 387 केंद्रांवर, तर दहावीची परीक्षा 5 हजार 111 केंद्रांवर घेतली जाणार आहे.
परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी राज्यातील सुमारे 80 टक्के परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. गैरप्रकार करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झालेल्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता आधीच रद्द करण्यात आली असून, यंदा कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना थारा दिला जाणार नसल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत सध्या जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, नैतिकता आणि परीक्षेचे गांभीर्य रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये शपथविधी, मार्गदर्शन सत्रे, पालक-विद्यार्थी संवाद कार्यक्रम; तसेच सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे.
राज्यस्तरीय समितीसोबतच जिल्हास्तरीय दक्षता समित्या आणि भरारी पथके सक्रिय राहणार असून, ही पथके अचानक भेटी देऊन परीक्षा केंद्रांची तपासणी करणार आहेत. पोलिस प्रशासन, शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून संपूर्ण परीक्षा कालावधीत कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत राज्य मंडळाचे अधिकारी, पोलिस अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, विभागीय कार्यालयातील अधिकारी अशा सर्वांचा समावेश आहे. समितीची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली असून, यंदा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे ठरवले आहे. या अभियानात जिल्हास्तरीय दक्षता समिती आणि भरारी पथके कार्यरत राहणार असून, समितीची नजर परीक्षा केंद्रांवर राहणार आहे.
सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त