Therapy Pudhari
पुणे

Pune Ketamine Therapy: ससून रुग्णालयात केटामाईन थेरपी सुरू; आत्महत्येचे तीव्र विचार कमी करण्यासाठी उपचारांचा पर्याय

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात ‘छात्र मानस कक्ष’ कार्यरत; विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनावर भर

पुढारी वृत्तसेवा

विनय पुराणिक

पुणे: आत्महत्येचे विचार तीव्र असलेल्या रुग्णांना पारंपरिक उपचारांना बाजूला ठेवून आधुनिक केटामाईन थेरपी उपचार देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. ससून रुग्णालयात नुकतीच ही औषधोपचार पद्धत सुरू करण्यात आली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ‘छात्र मानस कक्ष’ सुरू करून त्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन मानसिक अडचणींवर वेळीच संवाद आणि समुपदेशनाबाबत धडे दिले जात आहेत.

गंभीर नैराश्य, उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळणारी मानसिक अवस्था किंवा आत्महत्येचा वाढलेला धोका असलेल्या काही रुग्णांमध्ये औषधोपचार आणि इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी (ईसीटी) यांच्यासोबत रुग्णाच्या गरजेनुसार केटामाईनचा विचार केला जात आहे. आत्महत्येच्या तीव्र विचारांमध्ये तुलनेने लवकर घट आणणे हा या उपचारपद्धतीचा उद्देश आहे. दरम्यान, रुग्णाची मानसिक अवस्था, वैद्यकीय इतिहास आणि आत्महत्येची जोखीम लक्षात घेऊन उपचारपद्धती निश्चित केली जात आहे, अशी माहिती ससून रुग्णालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. निशीकांत थोरात यांनी दिली.

डॉ. थोरात म्हणाले, की प्रत्येक रुग्णासाठी हा उपचार योग्य नसून, वैद्यकीय आणि मानसिक स्थितीचा सखोल विचार करून तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच तो दिला जात आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरील मानसिक ताणाकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. ‘छात्र मानस कक्षा’त दररोज सुमारे चार ते पाच विद्यार्थी विविध समस्यांसाठी समुपदेशन घेत आहेत.

नवीन वातावरणाशी जुळवून घेणे, अभ्यासक्रमाचा ताण, कुटुंबापासून दूर राहणे, पुण्यातील नवीन जीवनशैलीशी जुळवून घेण्यातील अडचणी, तसेच आत्महत्येचे विचार अशा समस्यांचा त्यात समावेश आहे. मानसिक त्रासाची लक्षणे दिसल्यानंतरही मदत घेण्यास होणारा विलंब ही मोठी अडचण ठरते. त्यामुळे उपचारांसोबत संवाद, समुपदेशन आणि वेळेवर तज्ज्ञांची मदत घेण्यावर भर देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य हा केवळ व्यक्तीचा प्रश्न नसून कुटुंब, शिक्षणसंस्था आणि समाजाच्या आरोग्याशी जोडलेला सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा बनला आहे.

केटामाईन म्हणजे काय?

केटामाईन हे प्रामुख्याने भूल देण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. मात्र, वैद्यकीय देखरेखीखाली काही विशिष्ट मानसिक आजारांमध्ये, विशेषतः गंभीर नैराश्य आणि आत्महत्येच्या तीव्र विचारांच्या परिस्थितीत, त्याचा उपचारपर्याय म्हणून वापर केला जातो. पारंपरिक उपचारांच्या तुलनेत काही रुग्णांमध्ये त्याचा परिणाम तुलनेने लवकर दिसू शकतो. मात्र, हे औषध स्वतःहून घेण्याचे नसून मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच त्याचा वापर केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT